जगणं ‘चिल्लर’ समजू नका! कागदी नोटांपासूनही आहे धोका
By किरण अग्रवाल | Published: February 20, 2020 10:26 AM2020-02-20T10:26:18+5:302020-02-20T11:11:37+5:30
आध्यात्मिक अंगाने जाणारे हे प्रास्ताविक यासाठी की, नुकतीच एक वार्ता वाचनात आली. ‘खिशात खुळखुळणाऱ्या नाण्यांना चिल्लर समजू नका, आजाराला निमंत्रण देणारे ते साधन आहे’, अशी ही वार्ता होती.
- किरण अग्रवाल
भीतीतून घडून येणाऱ्या दबावामुळे व्यक्ती मर्यादा उल्लंघत नाही असे म्हटले जाते व बव्हंशी खरेही आहे ते. धाक नसला तर अनिर्बंधता आकारास येते, म्हणून तो असावा यावर बहुमत आढळते. याचप्रमाणे आरोग्याच्या बाबतीत सजगता व सावधानता बाळगली जाणेही गरजेचे असते, अन्यथा अनारोग्याला निमंत्रण मिळून गेल्याखेरीज राहात नाही. पण, याबाबतीत काळजी घेण्याचे सोडून नसती भीती बाळगली गेली किंवा नको तितका बाऊ केला गेला तर जगणेच अवघड बनून गेल्याशिवाय राहात नाही. खबरदारी अथवा सावधगिरीच्या रेषेवरून तोल सावरत वाटचाल करणे हे कसोटीचे असते खरे; परंतु आयुष्यातले अध्यात्म म्हणून त्याकडे बघितल्यास अवघड वाटा सुकर वा सुसह्य होण्यास नक्कीच मदत घडून येते.
आध्यात्मिक अंगाने जाणारे हे प्रास्ताविक यासाठी की, नुकतीच एक वार्ता वाचनात आली. ‘खिशात खुळखुळणा-या नाण्यांना चिल्लर समजू नका, आजाराला निमंत्रण देणारे ते साधन आहे’, अशी ही वार्ता होती. वडोदरा येथील एमएस विद्यापीठाच्या पर्यावरण अभ्यास विभागाने संशोधनाअंती ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. अभ्यासल्या गेलेल्या नाण्यांवर १२ प्रकारच्या बुरशी व किटाणू आढळून आले. यामुळे त्वचाविकार होण्याचा धोका असतो. विशेषत: रोगप्रतिकार शक्ती कमी असणाऱ्यांना अधिक समस्या सहन कराव्या लागू शकतात, असेही सांगितले गेले. संशोधनाअंतीच या बाबी पुढे आलेल्या असल्याने त्याबाबत संशय बाळगता येऊ नये. कुणाही सुजाण व सुबुद्ध नागरिकाला ही बाब तशीही पटणारी आहे, कारण कोणतेही नाणे कितीतरी हातांमधून हाताळले गेलेले असते; त्यामुळे ते संसर्गाला निश्चितच निमंत्रण देणारे ठरू शकते. पण हे सारे खरे व पटणारे असले तरी, मग व्यवहार करायचा तरी कसा हा स्वाभाविक प्रश्न यातून उपस्थित होतो. अर्थात, कॅशलेस-ऑनलाइन व्यवहाराचे पर्याय यासाठी उपलब्ध आहेत हेदेखील खरे, मात्र ते सदासर्वदा शक्य नाहीत. त्यामुळे मुद्दा पटणारा असला तरी काळजी कशी घ्यावी याबाबत डोके कुरतडणाराच म्हणता यावा.
महत्त्वाचे म्हणजे, नाणी अथवा चिल्लरच कशाला; नोटांची हाताळणीही अशीच असंख्य हातांनी होत असते. उलट काही महाभाग तर नोटा मोजताना सर्रासपणे थुंकीचा वापर करताना आढळून येतात. म्हणजे चिल्लरपेक्षाही अधिक किटाणू नोटांवर असावेत; पण करणार काय? चिल्लरवरील बुरशी त्वचारोगाला निमंत्रण देणारी ठरू शकते तशी नोटांवरची बुरशीही अनारोग्याला आमंत्रित करते. यासंदर्भातले एक उदाहरण नाशकातील प्रख्यात आयुर्वेद तज्ज्ञ संजीव सरोदे यांनी दिले, जे येथे सांगण्यासारखे आहे. अंगाला सतत खाज येते, असा साधा आजार घेऊन एक रुग्ण त्यांच्याकडे आला होता. यासंबंधी सर्व शक्यता पडताळून व औषधोपचार करूनही आराम नव्हता म्हणून डॉक्टरांनी रुग्णाची दिनचर्या जाणून घेतली. त्यात हे गृहस्थ दिवसभर आपल्या व्यावसायिक पेढीवर बसून केवळ मुलांनी व नोकरांनी सांगितल्याप्रमाणे ग्राहकाकडून मिळणा-या नोटा मोजून घेण्याचे काम करीत असल्याचे समजले. डॉक्टरांनी चार दिवस त्यांना नोटा मोजण्याचे काम न करण्याचा सल्ला दिला आणि आश्चर्य म्हणजे त्या गृहस्थाच्या अंगाला येणारी खाज संपली. तात्पर्य, नोटा हाताळण्यातून होणारा संसर्ग त्या व्यक्तीसाठी आजाराचे कारण बनला होता. तेव्हा ‘मेडिकली’ यातली कारणमीमांसा पटणारी असली तरी चिल्लर व नोटांपासून अलिप्त कसे राहायचे? खरे तर, अनारोग्यापासून बचाव करणारे तसेच डिजिटल व्यवहाराला चालना देण्यास पूरक ठरणारे वा साहाय्यभूत ठरणारेच यासंदर्भातले संशोधन आहे; पण व्यवहार्यतेच्या पातळीवर असलेली नाइलाजाची स्थिती हा यातील अडथळ्याचा मुद्दा आहे.
जाणीव, जागृती घडवून खबरदारी बाळगण्यास उद्युक्त करणारे असे संशोधन समस्यांपासून समाजाला दूर ठेवते. त्यामुळे व्यवहार्यतेत काही बाबी ‘शतप्रतिशत’ शक्य नसल्या तरी त्याकडे दुर्लक्ष करता येऊ नये. यासाठी सद्सद्विवेकबुद्धीने आचरण करणे हिताचे असते. आयुष्याचे अध्यात्म कोणते, तर ते हेच ! मनाचा निग्रह ढळू न देता, किंवा नाऊमेद न होता समस्येवर मात करता आली पाहिजे. अनेकदा अनेकांकडून असे काही सल्ले मिळतात की, आरोग्य सांभाळायचे तर किती पथ्ये पाळायची, असा प्रश्न पडतो. पण अंतिमत: त्यातील सजगताच कामी आलेली दिसून येते. तेव्हा, अडचणीची किंवा धोकेदायक असली तरी टाळता न येणारी बाब असेल तर किमान सावधगिरीला पर्याय नसतो. अशक्यतेच्या प्रश्नांत स्वत:ला अडकवून ठेवण्यापेक्षा शक्यतेच्या मार्गाने प्रयत्न केल्यास अडचणीही सुकर ठरतात, असे हे साधे-सोपे अध्यात्म आहे. ते ज्याला जमले त्याला चिल्लरच काय, नोटांपासून होणा-या संसर्गाचीही चिंता करण्याची गरज पडू नये. अर्थात शरीराला होणा-या संसर्गातून बळावणारे आजार दूर करता येतीलही, मनाला होणा-या संसर्गाचे काय? आजच्या धकाधकीच्या जीवनात पैसा हाच अनेकांसाठी वेगळ्या अर्थाने चिंतेचा विषय बनू पाहात असताना, त्याद्वारे होणा-या संसर्गाची चिंता कोण बाळगणार, हाच खरा प्रश्न ठरावा.