Eknath Shinde : शेतकऱ्यांनो चिंता करू नका...! या पावसात जेवढं नुकसान होईल ते सगळं आम्ही भरून देऊ, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 06:03 PM2023-03-18T18:03:56+5:302023-03-18T18:04:57+5:30
मुंख्यमंत्री शिंदे सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते...
नाशिक- गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात ठीक-ठिकाणी अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. याचा पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. यातच आता "शेतकऱ्यांनो चिंता करू नका! या पावसात जेवढे नुकसान होईल ते सर्व आम्ही भरून देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिले आहे. एवढेच नाही तर, शेवटी सरकार शेतकऱ्यांचं आहे, कष्ट कऱ्यांचं आहे आणि मुंडे साहेबांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. ते सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळ आणि स्मारकाच्या लोकार्पण कार्यक्रमावेळी बोलत होते.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासंदर्भात बोलताना शिंदे म्हणाले, आजही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारी जनता आपल्या घरातील शुभ कार्याची पत्रिका गोपीनाथ गडावर नेऊन ठेवतात. ही एक श्रद्धा आहे, प्रेम आहे आणि हा एक विश्वास आहे. या राज्यात अनेक लोकनेते आपण पाहिले. ज्यांनी चांगले काम केले ते लोकनेते म्हणून प्रसिद्ध झाले, मात्र गोपीनाथ मुंडे हे लोकनेते या बिरुदाचे मुकुटमणी होते.
मुंडेसाहेब या युतीचे शिल्पकार होते -
गोपीनाथ मुंडे यांनी सर्वसामान्यां माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष केला. आता तर गाड्या घोड्या सर्व आलं, पण सत्तरच्या दशकात त्यांनी सायकलवरून शबनमची झोली गळ्यात अडकवून, सायकलवरून प्रसंगी पायी प्रवास करून त्यांनी या राज्यात काना कोपऱ्यात भारतीय जनता पक्ष वाढविण्याचे काम केले. मुंडे आणि प्रमोद महाजन जी, हे खऱ्या अर्थाने या देशाची आणि राज्याची जी गरज होती, शिवसेना भाजप युतीची, मुंडेसाहेब या युतीचे शिल्पकार होते. बाळासाहेबांवरही त्यांचे प्रचंड प्रेम आणि श्रद्धा होती आणि बाळासाहेबांनाही त्यांच्याबद्दल मोठं प्रेम होते. विश्वास होता. याचे साक्षिदार आम्ही आहोत, असे शिंदे म्हणाले.
आपल्या राजकीय कारकिर्दीत मुंडे साहेबांनी अनेक चढउतारही पाहिले. त्यांच्या जीवनात चांगले दिवसही आहे. पण काही संघर्षाचा काळही आला. ज्या ज्या वेळी संघर्षाचा आणि अडचणींचा काळ येत होता, त्या त्यावेळी बाळासाहेब, मुंडे साहेबांना मार्गदर्शनाचे दोन शब्द सांगत होते, असे शिंदे म्हणाले.
...हे आपण मुंडेंकडून शिकण्यासारखं -
एक असे मोठा नेते जे देशालाही नेतृत्व देऊ शकले असते, असे नेते अकाली जातील, असे कुणालाही वाटले नव्हते. ते गेले तो काळा दिवस होता. त्यांनी समाजासाठी जे काम केले, त्यामुळे त्यांच्या शेवटच्या दिवशी जिकडे तिकडे माणसे वणव्यासारखी धावत होते. त्यांची अभ्यासू वृत्ती, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं वक्तृत्व आपण मुंडेंकडून शिकण्यासारखं आहे. ते सभागृहात बोलायला लागले, की सभागृहात सन्नाटा व्हायचा, असेही शिंदे यावेळी म्हणाले.