डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने डाळिंबबाग खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:33 AM2018-03-29T00:33:52+5:302018-03-29T00:34:35+5:30
देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत रमेश दामू सावंत या शेतकऱ्याची डाळिंबबाग होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचा सुमारे पंचवीस टन डाळिंब जळून लाखोंचे नुकसान झाले होते. यावर्षीसुद्धा शार्टसर्किट होऊन बाग जळाल्याने सावंत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरते हतबल झाले आहेत.
उमराणे : देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत रमेश दामू सावंत या शेतकऱ्याची डाळिंबबाग होरपळल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील वर्षी याच कारणाने त्यांचा सुमारे पंचवीस टन डाळिंब जळून लाखोंचे नुकसान झाले होते. यावर्षीसुद्धा शार्टसर्किट होऊन बाग जळाल्याने सावंत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पुरते हतबल झाले आहेत.
खारीपाडा शिवारात डोंगरगाव येथील शेतकरी सावंत यांनी साडेतीन हजार डाळिंब आणि एक हजार आवळा झाडांची बाग फुलविली आहे. शेतालगत असलेल्या वन्या ओहळच्या आजूबाजूला काटेरी झुडपे वाढली आहेत. झुडपांवरून वीजवाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या लोंबकळलेल्या स्थितीत असल्याने वारा व पक्ष्यांच्या हालचालीने शॉर्टसर्किट होते. यात सावंत यांच्या डाळिंबाच्या बागेतील सुमारे साठ ते सत्तर झाडे आगीने होरपळली आहेत. शेजारील शेतकरी बांधवांनी प्रसंगावधान राखत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. डोंगरगाव भागातील विद्युतवाहिन्या लोंबकळताना दिसतात. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकºयाचे आर्थिक नुकसान झाले आहे. मागील वर्षी सुमारे छत्तीस लाखांचे नुकसान झाले होते; परंतु वीज वितरण कंपनीने केलेल्या चुकीच्या पंचनाम्यामुळे या शेतकºयाला अद्यापही दमडीची भरपाईसुद्धा मिळालेली नाही.