सुटी लागण्यापूर्वीच शाळांमध्ये मिळणार डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 01:53 AM2022-03-25T01:53:01+5:302022-03-25T01:53:17+5:30
१२ ते १४ वयोगटातील बालकांना ‘कोर्बिव्हॅक्स’ लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या वयोगटातील बालकांची संख्या शाळेतच अधिक असल्याने त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी सुटी लागण्यापूर्वीच बालकांना शाळेतच डोस देण्यात यावेत, असे आदेश सर्व माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहेत.
नाशिक: १२ ते १४ वयोगटातील बालकांना ‘कोर्बिव्हॅक्स’ लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली आहे. या वयोगटातील बालकांची संख्या शाळेतच अधिक असल्याने त्यांचे लसीकरण व्हावे यासाठी सुटी लागण्यापूर्वीच बालकांना शाळेतच डोस देण्यात यावेत, असे आदेश सर्व माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहेत.
नाशिक जिल्ह्यात गेल्या १६ जानेवारी २०२१ पासून कोविड १९ प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झालेली आहे. सदर लसीकरण मोहीम वेगवेगळ्या टप्प्यात व वेगवेगळ्या वयोगटानुसार सुरू करण्यात आलेली आहे. १६ मार्चपासून १२ ते १४ वयेागटातील बालकांच्या लसीकरणालादेखील आता सुरुवात करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात आत्तापर्यंत ६० हजार बालकांना या लसीचे डोस देण्यात आलेले आहे. या वयोगटातील लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी शाळांमधून लसीकरणाचे सत्र सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.
या वयोगटातील लाभार्थी हे शालेय असल्याकारणाने तसेच लाभार्थ्यांचा समूह हा एकत्र शाळेत येत असल्याने त्यांचे एकाचवेळी लसीकरण करणे शक्य होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन शाळेतच लसीकरणाचे सत्र आयोजित करावेत, असे आदेश देण्यात आले आहेत.
शाळांना सुटी लागण्यापूर्वी अशाप्रकारचे लसीकरणाचे सत्र सुरू करून जास्तीत जास्त बालकांना ‘कोर्बिव्हॅक्स’ लसीचा डोस देण्याबाबतची कार्यवाही मुख्याध्यापकांनी करावे, असे आदेश देण्यात आले असून संबंधित शाळांनी आरोग्य विभागाशी संपर्क करून नियोजन करण्याचे सूचित करण्यात आले आहे. शाळेच्या जवळील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्य केंद्र, येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करून सत्र आयोजनाचे वेळापत्रक तयार करण्याचे कळविण्यात आले आहे.
--कोट--
लसीकरणाचा अहवाल सादर करावा
शाळांना सुटी लागण्यापूर्वी सदर लसीकरणाचे सत्र आयोजित करून शाळेतील १२ ते १४ वयोगटातील बालकांना ‘कोर्बिव्हॅक्स’ लसीचा डोस देण्याचे नियोजन करावे तसेच याबाबतचा अहवाल हा केंद्र प्रमुखाकडे पाठविणे आवश्यक आहे.
- डॉ. मच्छिंद्र कदम, शिक्षणाधिकारी, माध्यमिक