दोडीत म्हाळोबा महाराज यात्रोत्सवास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:29 AM2018-01-30T00:29:32+5:302018-01-30T00:29:57+5:30
दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस सोमवारपासून (दि. २९) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ४००च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.
नांदूरशिंगोटे : दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस सोमवारपासून (दि. २९) उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी स्थानिक भक्त परिवाराकडून सुमारे ४००च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला. राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत श्री म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. रविवारी रात्री सुमारे दोनशे भाविकांनी निफाड तालुक्यातील तामसवाडी येथून गोदावरीचे पाणी आणले. यात्रेच्या पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी ८ वाजता कावडीद्वारे आणलेल्या गंगेचे पाणी पंचमृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सुरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रूक गावात येताच फटाकड्यांची आतषबाजी करण्यात आली. चौकाचौकात महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले.