सटाण्यात दुभाजकच अपघाताना कारणीभूत
By admin | Published: May 14, 2016 10:14 PM2016-05-14T22:14:21+5:302016-05-14T22:21:06+5:30
लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांचा जावईशोध : लाखो रुपये खर्चून बांधलेले दुभाजक हटविण्याचे काम सुरू
सटाणा : शहरातून जाणारा विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावरील अतिक्रमण आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वारंवार अपघात होऊन हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला आहे. सुमारे साठच्या वर निष्पाप बळी गेले तर शेकडो विकलांग झाले. दुर्घटना घडली की फक्त बायपासचा विषय चर्चिला जातो. मंगळवारच्या दुर्घटनेने हेच सिद्ध झाले. जनप्रक्षोभ पाहून आमदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांसमोर तावातावाने बैठक घेऊन या बैठकीत होणाऱ्या दुर्घटनांना रस्ता दुभाजक कारणीभूत असल्याचा जावईशोध लावला. वाहतूक सुरळीत असावी हा मुख्य उद्देश ठेवून नाशिक नाका ते ताहाराबाद नाकादरम्यान लाखो रु पये खर्चून बांधलेले रस्ता दुभाजक काढण्याचे फर्मान सोडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग हा सटाणा शहरातून जातो. हा मार्ग गुजरात राज्याला जोडणारा जवळचा मार्ग असल्यामुळे साहजिकच वाहनांची वर्दळही मोठ्या प्रमाणात असते. मात्र शहरातून जाणाऱ्या या मार्गावर
पक्की अतिक्रमणे आणि राजकारण्यांच्या वरदहस्तामुळे टपरीदादांनी निर्माण केलेले हातगाडी आणि टपरींचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांना निमंत्रण मिळत असते.
गेल्या सात वर्षांपूर्वी या रस्त्याची कोंडी दूर करण्यासाठी बांधकाम विभागाने जिजामाता उद्यान ते ताहाराबाद नाका हा रस्ता सुशोभीकरणासाठी दोन कोटी
रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. (वार्ताहर)