लाल डब्यात आचारसंहितेला ‘डबलबेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 01:10 AM2019-09-25T01:10:18+5:302019-09-25T01:10:51+5:30
महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन् सरकारी जाहिरातींवर तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांच्या फलकांवर लगोलग वर्तमानपत्रांचे कागद चिकटविले गेले.
नाशिक : महाराष्ट विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला अन् सरकारी जाहिरातींवर तसेच लोकप्रतिनिधींनी केलेल्या विकासकामांच्या फलकांवर लगोलग वर्तमानपत्रांचे कागद चिकटविले गेले. कुठे कोनशिला कापडांमध्ये घट्ट बांधल्या गेल्या, तर कुठे रंगकाम करण्यात आले. मात्र, ‘बहुजन हिताय.. बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन खेडोपाडीच्या रस्त्यांवर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या लाल डब्यात मात्र या आचारसंहितेला सोयीस्कररीत्या डबलबेल देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या कृपेने लाल डब्यात सरकारी योजनांची आरामात सफर होत असताना आयोगाची करडी नजर असलेला हेडलाइट मात्र गूल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आचारसंहितेदरम्यान, सरकारचा अथवा कोणत्याही राजकीय पक्षाचा, त्याच्या उमेदवाराचा प्रचार होऊ नये, यासाठी काळजी घेतली जाते. सर्वत्र आचारसंहितेची अंमलबजावणी होत असताना एसटी महामंडळ मात्र त्याबद्दल अनभिज्ञ आहे की काय, अशी शंका यावी. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील अगदी शिवशाहीपासून ते हात देईल तेथे थांबा देणाºया लाल डब्यापर्यंत बिनदिक्कतपणे सरकारी योजनांच्या जाहिराती झळकत आहेत. एसटीमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करीत असतात. त्यातून सरकारी योजनांची माहिती पोहोचविण्याचा सरकारचा प्रयत्न बहुपयोगी असला तरी, आचारसंहितेत सर्वत्र झाकाझाक करणाºया सरकारी यंत्रणेला एसटीत झळकलेल्या जाहिराती मात्र अद्याप नजरेला पडल्या नाहीत. प्रत्येक आसनाच्या मागे विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.
एसटीत मात्र ‘आपले सरकार’
राज्यात सत्ताधारी पक्षांच्या नियंत्रणाखालीच सरकारी यंत्रणा काम करीत असते. असे असले तरी निवडणुका लागतात तेव्हा सरकारऐवजी निवडणूक आयोगाचे त्यावर नियंत्रण प्रस्थापित होत असते. निवडणूक यंत्रणेकडून शहरात आणि गावागावांत आचारसंहितेचा भंग होऊ नये म्हणून अगदी महापुरुषांच्याही नावाला कागद चिकटविला जात असताना एसटीत मात्र ‘आपले सरकार’ दिमाखात झळकत आहे.