महिला सरपंचासह तिच्या पतीच्या खूनप्रकरणी आरोपीस दुहेरी जन्मठेप
By admin | Published: March 20, 2017 10:30 PM2017-03-20T22:30:29+5:302017-03-20T22:30:29+5:30
दोन वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील नितळीपाडा येथील वृद्ध महिला सरपंच सरूबाई जयराम गवळी व तिचा पती जयराम ठमा गवळी यांची संशयावरून कोयता तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून
नाशिक : दोन वर्षांपूर्वी दिंडोरी तालुक्यातील नितळीपाडा येथील वृद्ध महिला सरपंच सरूबाई जयराम गवळी व तिचा पती जयराम ठमा गवळी यांची संशयावरून कोयता तसेच दगडाने ठेचून निर्घृण खून करणारा आरोपी किसन नामदेव गवळी (रा़ नितळीपाडा, ता़ दिंडोरी, जि़ नाशिक) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी सोमवारी (दि़२०) दुहेरी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़
या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, जयराम गवळी हे रात्रीच्या वेळी आरोपी किसन गवळीच्या घराजवळ फिरत होते़ याचा राग येऊन तू माझ्या घरी का आला, अशी कुरापत काढून आरोपी किसन गवळी याने जयराम गवळीचा पाठलाग करून कोयत्याने वार करून व दगडाने ठेचून खून केला़ यानंतर सरपंच सरूबाई हिच्यावरही कोयत्याने वार करून ठार मारले़ या घटनेची माहिती आरोपीनेच रहिवाशांना दिली मात्र पोलिसांना सांगितलेच नाही़
दुसऱ्या दिवशी जयराम गवळी यांचा मृतदेह एका नाल्यात आढळून आल्याने दिंडोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन खुनाचा गुन्हा दाखल केला होता़ या खुनाच्या तपासात किसन गवळीस अटक करण्यात आली, तसेच त्याच्याकडून रक्ताचे डाग असलेले कपडेही जप्त करण्यात आले होते़ आरोपी गवळीच्या घराजवळ राहणारे निवृत्ती व लक्ष्मण पाडवी यांचे जबाबही घेण्यात आले होते़
जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ यामध्ये सरकार वकील गायत्री पटणाला यांनी सहा साक्षीदार तपासून न्यायालयासमोर सबळ पुरावे सादर केले़ यामध्ये न्यायालयाने आरोपी किसन गवळी यास दुहेरी जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़