दोघा चोरट्यांकडून डझनभर दुचाकी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 01:09 AM2019-12-16T01:09:25+5:302019-12-16T01:09:52+5:30
जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरी करणाऱ्या मनमाडच्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक डझन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील विविध भागांमधून दुचाकी चोरी करणाऱ्या मनमाडच्या दोघा चोरट्यांना ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून चोरीच्या एक डझन दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरासह ग्रामीण भागातदेखील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले होते. तालुकास्तरावर दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त होत होत्या. यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडून माहिती घेत तत्काळ चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले.
यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांनी गुप्त बातमीदारांकडून माहिती घेण्यास सुरुवात केली असता मनमाडमध्ये दोन दुचाकी चोर असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी मनमाडमध्ये सापळा रचला. शनिवारी (दि.१४) मनमाडमधून संशयित राजू रमेश सपकाळे (२६), संदीप बाबूराव मोरे (२८, दोघे रा. विवेकानंदनगर, मनमाड) यांना संशयावरून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरी केलेल्या विविध कंपन्यांच्या एकूण साडेतीन लाख रुपये किमतीच्या १२ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. पोलीस निरीक्षक स्वप्नील राजपूत, उपनिरीक्षक संजयकुमार सोने, हवालदार रवींद्र वानखेडे, शांताराम घुगे, सुनील पानसरे, दीपक अहिरे आदींच्या पथकाने मुद्देमाल लपवून ठेवलेल्या ठिकाणी छापा मारला. यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणावरून चोरीच्या दुचाकी ताब्यात घेतल्या. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या शिर्डी येथील साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांत सक्रिय
दुचाकींना बनावट क्रमांकाच्या पाट्या लावून हे दोघे चोरटे नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील विविध गावे, शहरांमधून दुचाकी चोरी करीत असल्याचे पोलिसांच्या तपासात प्रथमदर्शनी पुढे आले आहे. त्यांनी शिर्डी येथे राहणारा संशयित साहिल शेख याच्या मदतीने मनमाड, येवला, निफाड, कोपरगाव, देवळा, मालेगाव या शहरांमधून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. या दोघांची कसून चौकशी पोलीस करीत आहेत. त्यांच्याकडून दुचाकी चोरीचा पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.