दमणगंगा-वैतारणा नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 10:58 PM2021-11-27T22:58:13+5:302021-11-27T23:00:14+5:30
सिन्नर : दमणगंगा -वैतारणा-कडवा-गोदावरी-देव लिंक या प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, तसा अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. डीपीआरचे काम पूर्ण झाल्याने लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघण्याबरोबरच उपलब्ध होणाऱ्या अधिकच्या सात टीएमसी पाण्याचा वापर सिन्नर तालुक्यातील घरगुती, औद्योगिक, सिंचन आणि प्रस्तावित मुंबई - दिल्ली कॉरिडोरसाठी करण्यात येणार आहे.
सिन्नर : दमणगंगा -वैतारणा-कडवा-गोदावरी-देव लिंक या प्रस्तावित नदीजोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल ( डीपीआर ) तयार करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून, तसा अहवाल हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास अभिकरणाने राज्य शासनाकडे सादर केला आहे. डीपीआरचे काम पूर्ण झाल्याने लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघण्याबरोबरच उपलब्ध होणाऱ्या अधिकच्या सात टीएमसी पाण्याचा वापर सिन्नर तालुक्यातील घरगुती, औद्योगिक, सिंचन आणि प्रस्तावित मुंबई - दिल्ली कॉरिडोरसाठी करण्यात येणार आहे.
दमणगंगा एकदरे या प्रकल्पातून नाशिक शहरासाठी पाच टीएमसी पाणी, तर गारगाई- वैतरणा-कडवा-देव या लिंक प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी सात टीएमसी पाणी अधिकचे उपलब्ध होणार आहे. या सात टीएमसी पाण्यातून घरगुती, सिंचन, औद्योगिक वापराच्या पाण्यासह दिल्ली - मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरचा पाणीप्रश्न सुटणार आहे. या दोन्हीही नदीजोड प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ४१ कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर झाले होते. दमणगंगा-वैतारणा-कडवा-गोदावरी देव लिंक या नदीजोड प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम शासनाने हैदराबाद येथील राष्ट्रीय जलविकास अभिकरण या संस्थेला दिले होते. संस्थेने या प्रस्तावित अभ्यासपूर्ण असा डीपीआर तयार केला आहे. राष्ट्रीय जलविकास अभिकरण पाहणी प्रकल्पाच्या या संस्थेने तयार केलेला डीपीआर नुकताच राज्य शासनाला सादर करण्यात आला असून, या प्रकल्पातून सिन्नर तालुक्यासाठी सात टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याची साठवणूक करण्यासाठी मोखाडा तालुक्यातील निळमाती, मेट, कोशिमशेट, उघाळे या गावांजवळील नद्यांवर धरणे बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर धरणांमधील पाणी पाइपलाइन व विशेष बोगद्याने वैतरणा जलाशयात टाकण्यात येणार आहे. वैतारणा जलाशयातील पाणी एका विशेष टनेलद्वारे कडवा जलाशयात सोडण्यात येणार आहे. शेवटच्या टप्प्यात कडवा जलाशयात जमा झालेले पाणी पाइपलाइन व बोगद्याद्वारे देव नदीमध्ये टाकण्यात येणार आहे. देव नदीमध्ये टाकलेल्या पाण्याचा वापर घरगुती, औद्योगिक, पिण्यासाठी सिंचन आणि मुंबई - दिल्ली कॉरिडोरसाठी करण्यात येणार आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
दमणगंगा-वैतारणा या प्रकल्पामुळे सात टीएमसी पाणी सिन्नर तालुक्याच्या वापरासाठी उपलब्ध होणार आहे. यापैकी २.१२ टीएमसी पाण्याचा वापर ११ हजार ४८० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी करण्यात येणार आहे. मुंबई - दिल्ली कॉरिडोअरसाठी २.६० टीएमसी पाणी आरक्षित ठेवलेले असून, उर्वरित पाण्याचा वापर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणून करण्यात येणार आहे. औद्योगिक आणि पिण्याच्या सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून सिन्नर तालुक्यातील एकूण ३३२० हेक्टर अतिरिक्त क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे लक्ष्य आहे.
सिन्नरसाठी ०.८० टीमएमसी पाणी राखीव
दमणगंगा-वैतारणा खोऱ्यातील हे पाणी सर्वप्रथम मोखाडा तालुक्यात नीळमाती, मेट, कोशिमशेत, उधाळे या ठिकाणी नव्याने बांधण्यात येणाऱ्या धरणांमध्ये टाकण्यात येणार असून, नंतर ते पाणी गोदावरी लिंक प्रकल्पाद्वारे गोदावरी खोऱ्याकडे वळविण्यात येणार आहे. नीळमाती गावाजवळील वाल नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणात १.५ टीएमसी, मेट गावाजवळील वाघ नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणात १.८६ टीएमसी पाणी, कोशिमशेट गावाजवळील पिंजाळ नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणात १.७० टीएमसी पाणी, उधाळे गावाजवळील गारगाई नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणात ०.९ ३ टीएमसी पाणी साठवण्यात येणार आहे. वैतारणा जलाशयात वरील चार धरणांमधील जमा झालेले पाणी कडवा जलाशयात टाकण्यात येणार असून, यासाठी ३१.८२ किमी लांबीचा पाइपलाइन व बोगदा बांधण्यात येणार आहे. कडवा जलाशयात साठलेले पाणी सिन्नर तालुक्यातील देव नदीमध्ये टाकण्यात येणार असून, यासाठी १४.१६ किमी लांबीची पाइपलाइन तयार करण्यात येणार आहे. सिन्नरवासीयांना पिण्यासाठी ०.८० टीएमसी पाणी राखीव ठेवण्यात आले आहे.
या प्रकल्पामुळे सिन्नर तालुक्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघण्याबरोबरच उपलब्ध होणाऱ्या अधिकच्या सात टीएमसी पाण्याचा वापर सिन्नर तालुक्यातील घरगुती, औद्योगिक, सिंचन आणि प्रस्तावित मुंबई - दिल्ली कॉरिडोरसाठी करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पाचा जिल्ह्याला मोठा फायदा होणार आहे.
- हेमंत गोडसे, खासदार