डॉ. आंबेडकरांचा अस्थिस्तूप राष्ट्रीय स्मारकाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:15 AM2020-12-06T04:15:04+5:302020-12-06T04:15:04+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दादर चौपाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याने तेथील भूमीला चैत्यभूमी असे संबोधले जाते. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर दादर चौपाटी येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याने तेथील भूमीला चैत्यभूमी असे संबोधले जाते. १९७१ मध्ये त्या ठिकाणी त्यांच्या अस्थी असलेले स्मारक बांधण्यात आले. मात्र तत्पूर्वीच म्हणजे १९५८ मध्येच सय्यद पिंप्री येथे स्मारक उभारण्यात आले असल्याने चैत्यभूमी इतकेच महत्त्व या स्थानाला असल्याचे येथील अनुयायांचे म्हणणे आहे. त्यामुळे या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षांपासून येथील रहिवासी प्रयत्न करीत आहेत.
तत्कालीन खासदार दादासाहेब गायकवाड यांच्या हस्ते येथील स्मारकाचे उद्घाटन झाले होते, तर आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराव आंबेडकर या सोहळ्याला उपस्थित होते. मुकुंदराव आंबेडकर यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले बोधिवृक्ष आजही या ठिकाणी आहे. लोकवर्गणीतून स्तूप आकारास आला आहे. डॉ. आंबेडकरांचे अंगरक्षक असलेले या गावचे सुपुत्र पी. एल. लोखंडे यांनी अस्थी मिळवून त्या सय्यद पिंप्री या आपल्या गावी आणल्या.
गावात उभारण्यात आलेला अस्थिस्तूप, त्यासमोरच असलेले बुद्धविहार आणि बोधिवृक्ष यामुळे या भूमीचे महत्त्व मोठे आहे. या भूमीचे पावित्र्य जपले जावे यासाठी येथील तरुणांनी सोशल मीडियावर गेल्या काही वर्षांपासून मोहीम सुरू केली आहे, मात्र राजकीय पातळीवर हा विषय अजूनही दुर्लक्षित आहे. ग्रामपंचायतीनेदेखील ठराव करून या भूमीचे संरक्षण आणि राष्ट्रीय दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे. मात्र त्यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही.
--कोट--
भारतातील हा पहिला स्तूप असल्याचे पुरावे आहेत; परंतु शासनदरबारी याची कोणतीच नोंद नाही. १९५८ मध्ये ’प्रबुद्ध भारत’ या वृत्तपत्रात या सोहळ्याचा वृत्तांत प्रकाशित करण्यात आला होता. स्मारकच नव्हे तर आंबेडकरांच्या अनेक आठवणी या गावात आहेत. या स्तूपाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा बहाल करून या भूमीचा विकास करावा असा आमचा प्रयत्न आहे.
- धनंजय लोखंडे, सदस्य, स्तूप स्मारक बहुद्देशीय संस्था, सय्यद पिंप्री