विद्रोही संमेलनाध्यक्षपदी डॉ. आनंद पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:18 AM2021-02-27T04:18:17+5:302021-02-27T04:18:17+5:30
नाशिक : विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे नाशिक येथे २५ व २६ मार्च रोजी होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या ...
नाशिक : विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे नाशिक येथे २५ व २६ मार्च रोजी होणाऱ्या १५ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे कथाकार आणि समीक्षक डॉ. आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
भांडवली पुरुषसत्ताक मूल्य संस्कृतीच्या विरोधात विद्रोही सांस्कृतिक चळवळ १९९९ पासून महाराष्ट्रभर कार्यरत आहे. यापूर्वी मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार, पुणे, धुळे, मनमाड या ठिकाणी १४ विद्रोही साहित्य संमेलने आणि एक आंतरराज्य व एक विद्रोही स्त्री साहित्य संमेलन यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत. यावर्षी नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात संमेलन घेतले जाणार आहे. अध्यक्षपदाची निवडदेखील सर्वसंमतीने झाल्याचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या महाराष्ट्राच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे, यशवंत मकरंद, किशोर ढमाले, राजू देसले यांनी जाहीर केले. डॉ. आनंद पाटील हे आशियातील एक आघाडीचे सांस्कृतिक, तुलनाकार, वैचारिक, ललित, प्रवासवर्णन, कथा, नाटककार आहेत. त्यांनी मराठी, ग्रामीण व इंग्रजी साहित्यात मोलाची भर घातली आहे.
इन्फो
संमेलनाध्यक्षांचे साहित्य
लघुकथा, कादंबरी,वैचारिक लेखन, प्रवासवर्णन अशा विविध साहित्य प्रकारांत आनंद पाटील यांनी मोठ्या प्रमाणात साहित्यनिर्मिती केली आहे. ‘कागूद’ ही गिरणी कामगारांच्या जीवनावरील ही पहिली लघुकादंबरी तसेच इच्छामरण ही गाजलेली कादंबरी आहे.. ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांच्या प्रकाशनांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले असून त्यांच्या लिखाणाचा अंतर्भाव भारतीय विद्यापीठांनी ८ पुस्तकांमध्ये समाविष्ट केला आहे. त्याशिवाय त्यांची मराठीत २ तर इंग्रजीत १ अशी प्रवासवर्णने प्रसिद्ध आहेत. त्यातील ‘पाटलाची लंडनवारी’ हिंदी व कन्नडमध्ये अनुवादित झाले आहे. तौलनिक साहित्य व संस्कृती अभ्यासातील मराठीत १२ व इंग्रजीमधील ६ ग्रंथ लिहून त्यांनी इतिहास घडविला आहे. तसेच ’महाराष्ट्राला माहीत नसलेले सम्राट शिवाजी’ या पुस्तकाने बेस्ट सेलरचा मान मिळविला होता. मराठी नाटकावरील पाश्चात्त्य प्रभाव, समग्र बा. सी. मर्ढेकर: तौलनिक सांस्कृतिक मीमांसा, समग्र शेक्सपिअर: तुलनात्मक सांस्कृतिक समीक्षा असे अनेक इंग्रजी - मराठी ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.
फोटो
२६आनंद पाटील