डॉ. चारुदत्त शिंदे यांनी स्वीकारला पदभार, जिल्हा शल्यचिकित्सकपदी झाले रुजू
By Sandeep.bhalerao | Published: October 26, 2023 06:38 PM2023-10-26T18:38:08+5:302023-10-26T18:38:29+5:30
आधीचे डॉ. अशोक थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे बदली
संदीप भालेराव, नाशिक : नंदुरबार येथून बदलून आलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार गुरुवारी (दि. २६) स्वीकारला. डॉ. अशोक थोरात यांची मुंबई येथे पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या जागी डॉ. शिंदे रुजू झाले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांची मुंबईतील वडाळा येथे सहायक संचालक आरोग्यसेवा एड्स येथे पदोन्नतीने बदली झाली तर नंदुरबारचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांची नाशिक जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे आदेश शासनाच्या वतीने बुधवारी (दि. २५) काढण्यात आले होते. उभयतांना त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारीच प्राप्त झाले होते. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी गुरुवारी (दि. २६) तातडीने पदभार स्वीकारला असून, डॉ. थोरात यांनी त्यांच्याकडे पदभार सुपुर्द केला.
२०२१ मध्ये जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना राज्य शासनाने डॉ. थोरात यांची नाशिक जिल्हा शल्यचिकित्सकपदी नियुक्ती केली होती. कोरोनाच्या काळात त्यांच्यापुढे कोरोनाची संवेदनशील परिस्थिती हाताळण्याचे आव्हान होते. त्यांनी या कठीण प्रसंगीही आरोग्य यंत्रणा सक्षम ठेवण्यासाठीचे नियोजन केले. नंदुरबारमध्ये जिल्हा शल्यचिकित्सक राहिलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांनीदेखील ठाणेसारख्या शहरात कोरोनाची स्थिती सांभाळली असल्याने त्यांच्या अनुभवाचा लाभ नाशिककरांनाही होणार आहे.