हिंमतराव बावस्कर यांना डॉ. वसंतराव स्मृती पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:26 AM2021-11-17T01:26:15+5:302021-11-17T01:26:38+5:30
निलवसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंट्र नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार-२०२० जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांना दिला जाणार आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्राची पवार यांनी मंगळवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत दिली आहे.
नाशिक : डॉ. निलवसंत फाउंडेशन अँड रिसर्च सेंट्र नाशिक यांच्यातर्फे दिला जाणारा डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार-२०२० जागतिक कीर्तीचे संशोधक डॉ. हिंमतराव बावस्कर यांना दिला जाणार आहे. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) रावसाहेब थोरात सभागृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित सन्मान सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. प्राची पवार यांनी मंगळवारी (दि.१६) पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, कोरोना संकटामुळे २०२० मध्ये हा पुरस्कार सोहळा होऊ शकला नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शिक्षण, वैद्यकीय, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी दरवर्षी दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारासाठी डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी कोकणात पोलादपूर येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून केले कार्य तसेच विंचू दंशावरील औषध संशोधनातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना डॉ. वसंतराव स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, मानपत्र, सन्मानचिन्ह व रुपये एक लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप असल्याचे निवड समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत बेळे, डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यातील देहेड गावात जन्मलेल्या डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी विंचू व सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण अधिक असलेल्या कोकणातील जंगली व दुर्गम आदिवासी भागात संशोधक वृत्तीने रुग्णांवर उपचार करतानाच त्यांच्या नोंदीचा अभ्यास करीत सोडियम नायट्रोफ्रुसाइट हे औषध वापरून समाजाला त्याची परिमाणकारकता सप्रमाम दाखवून दिली. विंचू दंशावर प्रभावी औषध नसताना त्यांनी लावलेल्या या शोधाला वैद्यकीय क्षेत्रात जगभर मान्यता मिळाली आहे. समाजासाठी दिलेल्या या अतुलनीय योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे निवड समिती सदस्यांनी सांगितले. यावेळी डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, बाळासाहेब जाधव, वसंत खैरनार, रवींद्र मणियार आदी उपस्थित होते.