बुद्धीजिवी वर्गाकडून डॉ. आंबेडकरांना होती मोठी अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:14 AM2021-04-14T04:14:02+5:302021-04-14T04:14:02+5:30
नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी बुद्ध ...
नाशिक : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. भारतात या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी त्यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या प्रमाणभुत ग्रंथाची निर्मिती केली; मात्र सामाजिक क्रांतीसाठी त्यांना समाजातील बुध्दीजिवी वर्गाकडून ज्या अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्या नाहीत, अशी खंत भाभा परमाणु अणुसंशोधन केंद्रातील वैज्ञानिक अधिकारी अजयकुमार चंदनशिवे यांनी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील माजी विद्यार्थी परिवाराच्यावतीने महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवानिमित्त आयोजित प्रवर्तन या ऑनलाइन व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प चंदनशिवे यांनी, ‘धर्म परिवर्तन झाले, विचार परिवर्तनाचे काय’ या विषयावर गुंफले. आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात विविध दाखले देत चंदनशिवे यांनी मानवी जीवन समजावून घेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे भगवान बुद्ध हे जगातील पहिले वैज्ञानिक ठरतात. आपल्या भूमिकेचा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बुध्दीजिवी लोकांचा भिख्खुसंघ स्थापन केला. त्या माध्यमातून भारतात सर्वत्र बुद्ध धम्माचा प्रसार झाला. एका अर्थांने भिख्खु संघ हे जगातील पहिले केडरबेस संघटन होते, असेही ते म्हणाले. बुद्ध धम्म स्वीकारल्यानंतर आपण जातीच्या पलीकडे गेलोच नाही, बुध्दीजिवी लोकांनी हे कार्य करणे डॉ. आंबेडकरांना अपेक्षित होते, असेही ते म्हणाले. ऑनलाइन झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. शुद्धोधन कांबळे यांनी केले. आभार डॉ. गणेश सूर्यवंशी यांनी मानले. राज्यभरातील माजी विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.