डॉ. जयंत नारळीकर साहित्य संमेलनाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:51 PM2021-01-24T16:51:00+5:302021-01-24T16:51:32+5:30
यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक : दीड दशकांनंतर यंदा नाशिकला होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रख्यात खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड करण्यात आली आहे. साहित्य संमेलनाच्या आतापर्यंतच्या ९३ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका विज्ञान कथा लेखक आणि संशोधकाची संमेलनाध्यक्ष पदी निवड झाल्याने नाशिकचे संमेलन सर्वार्थाने वेगळे ठरणार आहे.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी पत्रकारपरिषदेत संमेलनाध्यक्ष पदाची घोषणा केली. महामंडळाचे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शनिवारपासून नाशिकमध्ये बैठका सुरु असून त्यातून डॉ. नारळीकर यांच्या नावाला पसंती देण्यात आली. विज्ञान संशोधनातील स्वकर्तृत्वाने देशाचे सर्वोच्च पद्मभूषण आणि पद्मविभूषण अशा पुरस्कारांनी त्यांना भारत सरकारने यापूर्वीच गौरवलेले आहे. त्यांनी विज्ञान कथालेखक म्हणून एकाहून एक ज्ञानवर्धक आणि रंजक भाषांतील पुस्तकांचे लेखन केले असून त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. तर 'चार नगरांतले माझे विश्व'या मराठी आत्मचरित्राला दिल्लीच्या साहित्य अकादमीचा आणि अमेरिकेतील फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कारानेदेखील त्यांना गौरविण्यात आले आहे. महामंडळाच्या पुणे विभागीय कार्यालयाने डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविला होता. तेव्हापासूनच डॉ. नारळीकर यांच्या नावाची चर्चा होऊन रविवारी त्यावर मोहोर उमटवण्यात आल्याचे ठाले पाटील यांनी नमूद केले. यावेळी त्यांच्यासमवेत उपाध्यक्ष डॉ. दादा गोरे, रामचंद्र काळुंखे, आयोजक लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, विश्वस्त हेमंत टकले आदी मान्यवर उपस्थित होते .
२६ मार्चला संमेलनाचा शुभारंभ
यंदाच्या साहित्य संमेलनासाठी नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसची निवड करण्यात आली आहे. तसेच सर्वसंमतीने आणि रसिकांच्या सोयीचा विचार करुन २६ मार्च ते २८ मार्च या काळात संमेलन घेण्याचा निर्णय झाल्याचेदेखील ठाले पाटील यांनी सांगितले. २६ मार्चला कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या निवासस्थानापासून ग्रंथ दिंडीने या संमेलनाचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.
तीन नावांचीही चर्चा
संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी विदर्भ साहित्य संघाकडून आलेले भारत सासणे तसेच मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे यांचे नावदेखील चर्चेत होते. तसेच महामंडळाच्या प्रथेनुसार आयोजक लोकहितवादी संस्थेने नाशिकचे प्रख्यात साहित्यिक मनोहर शहाणे यांचे नाव सुचविल्याने त्यांचे नावदेखील अध्यक्ष पदासाठी चर्चेत होते . मात्र, महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर डॉ. नारळीकर यांचेच नाव निश्चित करण्यात आले.