डॉ. आंबेडकरांच्या वस्तूंचे जतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:56 AM2018-04-14T00:56:49+5:302018-04-14T00:56:49+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा नाशिकमध्ये असून, चळवळीतील या आठवणी त्यांच्या अनुयायांनी आजही जपून ठेवल्या आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह असो की येवला येथील मुक्तिभूमीवरील धर्मांतराची घोषणा, या ऐतिहासिक घटनांबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या सान्निध्यातील अनेक आठवणी नाशिकमध्ये आजही जिवंत ठेवल्या आहेत.
नाशिक : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा नाशिकमध्ये असून, चळवळीतील या आठवणी त्यांच्या अनुयायांनी आजही जपून ठेवल्या आहेत. काळाराम मंदिर सत्याग्रह असो की येवला येथील मुक्तिभूमीवरील धर्मांतराची घोषणा, या ऐतिहासिक घटनांबरोबरच डॉ. आंबेडकरांच्या सान्निध्यातील अनेक आठवणी नाशिकमध्ये आजही जिवंत ठेवल्या आहेत. असाच एक खजिना नाशिकमध्ये असून, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू संग्रहित करून ठेवण्यात आल्या आहेत. रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालयात बाबासाहेबांच्या वस्तूंचे वस्तुसंग्रहालय तयार करण्यात आले आहे. यामध्ये बाबासाहेबांचे पांढऱ्या रंगाचे हाफ पॅन्ट-शर्टचे दोन सूट, चॉकलेटी रंगाचा फूल सूट, दोन हॅट, बूट असे साहित्य जपून ठेवण्यात आले आहे. शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या महाबोधी स्तुपामध्ये डॉ. आंबेडकरांच्या अस्थींचा काही भागदेखील एका चांदीच्या कुपीत ठेवण्यात आला आहे. बाबासाहेबांच्या या वस्तू कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी रमाबाई आंबेडकर शाळेत जतन करण्यासाठी दिल्या होत्या, असे सांगितले जाते. १९४७ मध्ये या वस्तू स्वत: बाबासाहेबांनी दादासाहेब गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केल्या होत्या. तेव्हा त्यांनी या वस्तू रमाबाई आंबेडकर शाळेत दिल्या. या वस्तू आजही शाळेने जतन करून ठेवल्या आहेत. नाशिककरांसाठी ही अभिमानाची बाब आहे.
डॉ. आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय चळवळीमुळे देशभर त्यांच्या आठवणींच्या अनेक पाऊलखुणा आहेत. त्यांचा पदस्पर्श आणि सान्निध्यामुळे अनेक वास्तू आणि वस्तूंना महत्त्व प्राप्त झालेले आहे. नाशिकमधील काळाराम मंदिर सत्याग्रह, येवला येथील मुक्तिभूमीवरील ऐतिहासिक भाषण असो की नाशिक न्यायालयातील त्यांची उपस्थिती याबाबत नाशिककर आवर्जून आठवण काढतात. अनेकांच्या घरी बाबासाहेब आल्याच्यादेखील आठवणी आहेत. मोठा राजवाडा, इंडिया सिक्युरिटी प्रेस विश्रामगृह, नाशिकरोड बुद्धविहार, पाथर्डी, देवळाली कॅम्प आदी अनेक ठिकाणी बाबासाहेबांचे पदस्पर्श लागले आहेत.