डॉ. सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात?; तपासानंतरही गूढ कायम, पतीची निर्दोष मुक्तता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 10:56 IST2025-02-11T10:54:54+5:302025-02-11T10:56:40+5:30

पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

Dr Suvarna Vaje was murdered or an accident Mystery remains even after three years husband acquitted | डॉ. सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात?; तपासानंतरही गूढ कायम, पतीची निर्दोष मुक्तता!

डॉ. सुवर्णा वाजेंचा खून झाला की अपघात?; तपासानंतरही गूढ कायम, पतीची निर्दोष मुक्तता!

Nashik Murder Case: महापालिकेच्या तत्कालीन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांच्य बहुचर्चित खून प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयात दोन दिवस चाललेल्या अंतिम सुनावणीअंती न्यायालयाने त्यांचे पती संशयित संदीप महादू वाजे (४२) व त्यांचा मावसभाऊ संशयित बाळासाहेब ऊर्फ यशवंत रामचंद्र म्हस्के (५१) यांची सबळ पुराव्यांअभावी जिल्हा व सत्र न्यायाधीश रूपेश राठी यांच्या न्यायालयाने सोमवारी (दि.१०) निर्दोष मुक्तता केली. तसेच न्यायालयाने ग्रामीण पोलिसांच्या तपासावर देखील ताशेरे ओढले आहेत. सुवर्णा वाजे यांचा खून झाला की अपघात, हा प्रश्न तपासाअंतीही कायम आहे.

सिडको येथील मनपाच्या स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत तत्कालीन वैद्यकीय अधिकारी सुवर्णा संदीप वाजे (३८) या २५ जानेवारी २०२२ साली बेपत्ता झाल्या होत्या. यामुळे त्याच रात्री याप्रकरणी संदीप वाजे यांनी अंबड पोलिस ठाण्यात पत्नी सुवर्णा वाजे बेपत्ता झाल्याची तक्रारदेखील दिली होती. विल्होळीजवळच्या रायगडनगर येथे लष्कराच्या हद्दीच्या प्रवेशद्वार क्रमांक ३६ समोर वाडीवन्हे पोलिसांना २६ जानेवारी रोजी एक कार जळालेल्या अवस्थेत आढळून आली होती. ती कार (एमएच १५ डीसी ३८३२) वाजे यांची असल्याचे तपासात पुढे आले होते. मोटारीत आढळून आलेल्या मानवी हाडांचा डीएनएन हा सुवर्णा वाजेंचा असल्याचेही प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झाले होते. यासाठी पोलिसांनी वाजे यांच्या वडिलांचे डीएनएन नमुने घेतले होते. हे नमुने जुळले होते. पराकोटीला गेलेला कौटुंबिक कलहामुळे वाजे यांनी पत्नीचा खून केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला होता. त्यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती.

दोन दिवस युक्तिवाद
जिल्हा व सत्र न्यायालयात वाजे यांच्या खून प्रकरण खटल्याच्या अंतिम सुनावणीचा युक्तिवाद दोन दिवस चालला. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर सोमवारी (दि.१०) याप्रकरणी निकाल दिला. तीन वर्षे याबाबत न्यायिक प्रक्रिया सुरू राहिली. या निकालानंतर नाशिक ग्रामिण पोलिसांकडून उच्च न्यायालयात अपील केले जाणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.

सरकार पक्षाकडून २१ साक्षीदार तपासले
न्यायालयाने वाजे यांना या प्रकरणात सुरुवातीला चौदा दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. याप्रकरणी वाडीव-हे पोलिस व ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने तपास करत ही कारवाई केली होती. यावेळी डॉ. सुवर्णा वाजे यांच्या माहेरच्या नातेवाइकांचाही जबाब नोंदविण्यात आला होता. दरम्यान, सरकार पक्षाकडून न्यायालयात २१ साक्षीदार तपासण्यात आले. यावेळी सबळ पुरावे या गुन्ह्यात सरकार पक्षाला सादर करता आले नाही. यामुळे संशयित वाजे व म्हस्के यांची या गुन्ह्यातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली, अशी माहिती त्यांचे वकील राहुल कासलीवाल यांनी दिली आहे.

घातपात की अपघात? हा प्रश्न तीन वर्षांनंतरही कायम
न्यायालयाने सबळ पुराव्यांअभावी संदीप वाजे व म्हस्के यांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुवर्णा वाजे यांचा मृत्यू घातपाताने झाला की अपघाताने? हे न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाही. या प्राथमिक बाबीची स्पष्टता न्यायालयात पोलिसांकडून होऊ शकली नाही. यामुळे सुवर्णा वाजे या त्यांच्या रुग्णालयातून ओपीडी आटोपून जेव्हा बाहेर पडल्या तेव्हा त्यांना जो व्यक्ती भेटला तो कोण होता? हेदेखील पोलिसांनी न्यायालयात सांगितले नाही. कारण हा अज्ञात व्यक्त्ती वाजे यांना मृत्यूपूर्वी भेटलेला शेवटचा व्यक्ती होता.
 

Web Title: Dr Suvarna Vaje was murdered or an accident Mystery remains even after three years husband acquitted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.