डॉ. तात्याराव लहाने यांनी आजार टाळण्याचे सूत्रच उलगडून दाखवले
By Admin | Published: May 25, 2015 01:49 AM2015-05-25T01:49:59+5:302015-05-25T01:53:10+5:30
डॉ. तात्याराव लहाने यांनी आजार टाळण्याचे सूत्रच उलगडून दाखवले
नाशिक : पिण्याच्या पाण्याचे प्रमाण, सकाळच्या नाश्त्यापासून ते जेवणाच्या वेळा, व्यायामाची महत्त्व यांसारख्या अनेक मुद्द्यांना स्पर्श करीत मुंबईच्या जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी आजार टाळण्याचे सूत्रच उलगडून दाखवले. शिवाय सध्याच्या जीवनपद्धतीवर टीका करीत श्रोत्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजनही घातले. नाशिक वसंत व्याख्यानमालेचे स्व. शांतारामबापू वावरे स्मृतिप्रीत्यर्थ चोविसावे पुष्प गुंफताना ‘आजार कसे टाळावेत?’ या विषयावर डॉ. लहाने बोलत होते. ते म्हणाले, रोज किमान तीन लिटर पाणी प्यायला हवे. बाटलीने पाणी न पिता पेल्याने हळूहळू प्यावे. संपूर्ण पोटभर कधीच जेऊ नये. कमी जेवण केले तरच अन्नाचे पचन होते व आजार टाळता येतात. एकदाच भरपेट जेवणे चुकीचे असून, त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम होतात. रात्री पोटभर जेवल्यामुळे मधुमेहाची शक्यता वाढते. रात्री लवकर जेवावे व झोपताना एखादे फळ, बिस्किट खाऊन झोपावे. रात्री जेवल्यानंतर शतपावली करणे गरजेचे आहे. अन्न पोटात ठेवून झोपणे हे आजाराला निमंत्रण देण्यासारखेच आहे. आहारात चमचमीत पदार्थांचा समावेश नसावा. त्यातून कोलेस्टेरॉल वाढते व हृदयविकार, मधुमेह उद्भवतो. सकाळी अवश्य डाळ खावी. रात्री मात्र तिचे प्रमाण कमी ठेवावे. कोणतेही तूप रोज भरपूर खाणे हे रोज मटण खाण्यासारखेच आहे. बहुतेकांच्या सकाळच्या नाश्त्यात तळलेल्या पदार्थांचा समावेश असतो. हेदेखील आजाराचे मुख्य कारण असते. तळलेले पदार्थ आठवड्यातून एकदा-दोनदा दुपारच्या जेवणात सेवन करावेत. ज्यांच्या पोटाचा घेर ३० इंचांपेक्षा अधिक असतो, त्यांना मधुमेह झालेला असतो वा तो होण्याचा धोका अधिक असतो. वाढलेले पोट ही ‘शुगर फॅक्टरी’ असल्याचा इशारा त्यांनी दिला. रोज किमान चालण्याचा व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनशैलीतील व आहारातील हे बदल अमलात आणणे फार कठीण नसते; मात्र आपली इच्छाशक्ती कमी पडते, असेही ते म्हणाले. ‘खा पिझ्झा बर्गर, व्हा आजाराने जर्जर... खा भाकरी-भाजी, जगा होईतो आजोबा-आजी’ या डॉ. लहाने यांनी सादर केलेल्या घोषवाक्याला उपस्थितांनी दाद दिली.श्रीकांत बेणी यांनी डॉ. लहाने यांचा परिचय करून दिला. संगीता बाफना यांनी शांतारामबापू वावरे यांच्या कार्याची माहिती दिली. (प्रतिनिधी)