‘पीटीए’च्या मागण्यांना मसुदा समितीची संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:47 AM2018-01-17T11:47:40+5:302018-01-17T11:49:50+5:30
राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या कच्चा मसुद्यावर खासगी क्लासचालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले सर्व बदल स्वीकारण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीर्चस असोसिएशनतर्फे मंगळवारी देण्यात आली.
नाशिक : राज्य शासनाचा प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८ कायद्याच्या कच्चा मसुद्यावर खासगी क्लासचालकांची संघटना प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने सुचविलेले सर्व बदल स्वीकारण्यात आल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीर्चस असोसिएशनतर्फे मंगळवारी देण्यात आली. या प्रस्तावित विधेयकाच्या मसुद्यावर चर्चा करण्यासाठी कोचिंग क्लासेस संघटनेचे सहा प्रतिनिधी व शासन समिती यांच्यात सोमवारी (दि.१५) शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत मसुदा समितीने महत्त्वपूर्ण विषयात बदल मान्य केल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले आहे.
राज्यशासनाच्या प्रस्तावित महाराष्ट्र खासगी शिकवणी अधिनियम २०१८च्या कच्चा मसुद्यातील अटी-शर्ती खासगी क्लासेसचालकांना जाचक ठरणाºया असल्याची भूमिका घेत प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला होता. त्याचप्रमाणे शासनाच्या मसुद्यात काही बदलही सुचविण्यात आले होते. हे सर्व बदल शिकवणी विधेयकाच्या मसुदा समितीने स्वीकारल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे प्रसिद्धी प्रमुख लोकेश पारख यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथे सोमवारी शिक्षण आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शासनाच्या मसुदा समिचीने पीटएच्या मागण्या मान्य करीत क्लासची नोंदणी फी दहा हजार ऐवजी ग्र्रामपंचायत स्तरावर पाचशे रुपये, नगरपालिका स्तरावर एक हजार रुपये व मनपा स्तरावर १५०० रुपये करण्यास संमती दर्शविली आहे. त्याचप्रमाणे, शासकीय नियमांचे उल्लंघन केल्यास दोन वर्षे कैद व पाच लाख दंडाऐवजी फक्त द्रव्यदंडाची शिक्षा करण्यात येणार आहे. अधिकृत पार्किंग शब्दाऐवजी सार्वजनिक पार्किंग व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जागांवर पार्किंग अशी सुधारणा करून नवीन कायद्यात तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी पीटीएला देण्यात आले आहे. तसेच पहिली ते बारावीपर्यंच्या संबंधित कोचिंग क्लासेसचा अंतर्भाव असलेल्या तरतुदीत नव्याने सर्व स्पर्धा परीक्षांसाठीच्या कोचिंग क्लासेसचा अंतर्भाव करण्याची मागणीही मसुदा समितीने मान्य केल्याची माहिती पीटीएतर्फे देण्यात आली आहे.