रुग्णालयाच्या आवारातच नाला, अन् म्हणे आरोग्य सांभाळा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 01:27 AM2018-10-09T01:27:58+5:302018-10-09T01:28:20+5:30
रुग्णालय नीटनेटके मात्र कंपाउंडमधूनच नाला वाहत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव, महापालिकेच्या रुग्णालयाचीच अशी स्थिती असेल तर नागरिकांना आरोग्य सांभाळा असे सल्ले कसे देता येईल, असा प्रश्न शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने केला आहे.
सातपूर : रुग्णालय नीटनेटके मात्र कंपाउंडमधूनच नाला वाहत असल्याने दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव, महापालिकेच्या रुग्णालयाचीच अशी स्थिती असेल तर नागरिकांना आरोग्य सांभाळा असे सल्ले कसे देता येईल, असा प्रश्न शिवसेनेच्या प्रतिनिधी मंडळाने केला आहे.
शिवसेनेने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पाडणाऱ्या मोहिमेअंतर्गत सोमवारी (दि.८) अचानक मायको रुग्णालयाला भेट दिली असताना हा प्रकार आढळला. रुग्णालयाजवळून वाहणारी उघडी गटार, आॅपरेशन थिएटरमध्ये विद्युत व्यवस्था नाही, रुग्णांसाठी खाटांची अपुरी संख्या, अपुरा कर्मचारी वर्ग, रुग्णालयाची दुरवस्था पाहून मनपा प्रशासनाच्या उदासीनतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक संतोष गायकवाड, सीमा निगळ, राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे तसेच गोकुळ निगळ, अलका गायकवाड, योगेश गांगुर्डे आदींसह शिवसेना पदाधिकाºयांनी सोमवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास मायको हॉस्पिटलला अचानक भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयातील रुग्णांशी संवाद साधला. तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. रुचिता पावसकर यांच्याकडून सर्व माहिती जाणून घेतली. रुग्णालयाजवळून वाहणारी उघडी गटार, आॅपरेशन थिएटरमध्ये विद्युत व्यवस्था नाही, सिझर करण्याची सोय नाही, सिझरसाठी जिल्हा रुग्णालयात अथवा बिटको रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होते. रुग्णांसाठी फक्त २० खाटांची सोय असून, खाटांची संख्या अपूर्ण आहे. सोनोग्राफीची सोय नाही, अपुरा कर्मचारी वर्ग, रुग्णालयाची दुरवस्था पाहून मनपा प्रशासनाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
सोयीसुविधा आवश्यक
कामगार वस्ती आणि स्लम भागातील हे रुग्णालय अतिशय उपयुक्त ठरत आहे. गोरगरीब जनता या रुग्णालयाचा लाभ घेत आहे. सर्वाधिक प्रसूती या मायको रुग्णालयात होत असताना मनपा प्रशासनाने सर्व प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. या रुग्णालयाचे नूतनीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. मनपा प्रशासन ऐकत नसेल तर वेगळी महासभा घेण्यास भाग पाडू, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे यांनी दिली आहे.