पुलांच्या कथड्यांना पाणवेली, प्लॅस्टिक अडकले, स्वच्छता सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 01:05 AM2019-08-06T01:05:51+5:302019-08-06T01:06:40+5:30
पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते.
नाशिक : पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांच्या कथड्यांना मोठ्या प्रमाणात पाणवेली आणि प्लॅस्टिकच्या पिशव्यांसह कापडाचे तुकडे अडकल्याचे समोर आले आहे. रविवारी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. सोमवारी पुराची पातळी कमी झाल्यानंतर पुलांवर सर्वत्र चिखल साचलेला आढळून आला, तर कथड्यांना मोठ्या प्रमाणात कचरा अडकल्याने महापालिकेकडून कथडे साफ करण्याचे काम सुरू होते.
जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नदीला महापूर आल्याने या पुरात नदीवरील अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले होते. शहरातील आनंदवली, आसाराम पूल, रामवाडी, तपोवन, टाकळी, तपोवनरोड आदी अनेक पुलांवरून पाणी वाहत होते. पुराची पातळी वाढत गेल्याने या सर्व पुलांवरील वाहतूक बंद करण्यात आली होती. गेल्या चोवीस तासांपेक्षा अधिक काळ पुलांवरून पाणी वाहत असल्याने पाण्यात वाहून आलेला कचरा कथड्याला अडकून पडला आहे. या सर्वच पुलांवर मोठ्या प्रमाणात कचरा आणि चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पावसाची तीव्रता काहीशी कमी झाल्यानंतर पुलांवरील कचरा काढण्याचे काम सुरू करण्यात आले.
पाण्यात मोठ्या प्रमाणात थर्माकोल, कापडाचे तुकडे आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या, वेफर्स पाकिटांचे रॅपर वाहून आले आहेत. पाणवेली पुलांच्या दोन्ही कथड्यांना विळखा मारून बसल्या असून, या पाणवेलींच्या जाळ्यात पुरातून वाहून आलेला कचरा मोठ्या प्रमाणात पुलावर साचला आहे. वाहून आलेल्या अनेक वस्तंूमध्ये कचऱ्याने भरलेल्या मोठमोठ्या गोण्यादेखील पुलाच्या कथड्याला अडकून पडल्याचे दिसते. काही पुलांवर झाडांच्या मोठमोठ्या फांद्या, पीव्हीसी पाइप्सदेखील वाहून आले आहेत. प्लायवूडचे तुकडे, वखारीतील काही फळ्या पुराच्या पाण्यात वाहून आल्याचे दिसून आले.
गोदाघाटवरील अनेक पुलांच्या कठड्यांना पाणवेली, झाडांच्या फांद्या अडकल्याने पुलावर देखील गाळ आणि चिखल असल्याने रहदारीसाठी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रहदारी थांबली होती.
नागरिकांची मानसिकताही उघड
गोदापात्रात वाहून आलेल्या केरकचºयाच्या गोण्या पाहता नदीपात्रात कचरा सोडून दिला जात असल्याची प्रवृत्तीही यानिमित्ताने उघड झाली आहे. नदीकाठी असलेले हॉटेल्स, स्नॅक्सचे हातगाडे, चायनीज खाद्यपदार्थ विक्रेते तसेच काही रहिवासी संकुले आहेत. नदीपात्र जवळ असल्याने हॉटेल्स आणि घरातील टाकाऊ वस्तू थेट नदीपात्रात सोडून दिल्या जात असल्याचे यावरून दिसून आले. नदी प्रदूषित करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. परंतु अशाप्रकारे राजरोसपणे कचºयाच्या गोण्या नदीपात्रात प्रवाहित केल्याचे समोर येत असल्याने अशा नागरिकांवरदेखील कारवाई होणे अपेक्षित असल्याची चर्चा होत आहे.