शौचालय योजनेचा ड्रेनेजवर ताण

By Admin | Published: December 24, 2015 12:23 AM2015-12-24T00:23:22+5:302015-12-24T00:24:33+5:30

स्वच्छ भारत : पंचवटीत सर्वाधिक शौचालयांचे काम

Drainage stress of toilets scheme | शौचालय योजनेचा ड्रेनेजवर ताण

शौचालय योजनेचा ड्रेनेजवर ताण

googlenewsNext

नाशिक : केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानअंतर्गत नाशिक महापालिकेने उघड्यावर शौचविधीस बसणाऱ्या नागरिकांसाठी शौचालय बांधून देण्याची योजना राबविण्यास सुरुवात केली असली तरी झोपडपट्टी भागात त्याची सर्वाधिक संख्या असल्याने ड्रेनेज लाइनवर ताण पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, भविष्यात ड्रेनेज लाइन तुंबून मलनिस्सारण व्यवस्था कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पंचवटी विभागात सर्वाधिक लाभार्थी असून सहाही विभागातील सुमारे ४१८७ लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकारमार्फत स्वच्छ भारत (नागरी) अभियानअंतर्गत घरोघरी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार, महापालिकेने पाच महिन्यांपूर्वी शहरात सर्वेक्षण केले असता, ५१ हजार ५८४ कुटुंबांच्या घरात शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, तर ४४ हजार ६८० कुटुंबांकडून सार्वजनिक शौचालयांचा वापर होत असल्याचे समोर आले होते. ७१७४ कुटुंबे मात्र उघड्यावरच शौचविधी पार पाडत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, महापालिकेने सदर ७१५४ कुटुंबांकडून शौचालय उभारणीसंबंधी अर्ज भरून घेतले होते. प्राप्त अर्जांची छाननी केल्यानंतर त्यातील ८७७ अर्ज तांत्रिक मुद्द्यांवरून बाद ठरविण्यात आले. ६०७३ लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जाणार असून त्यांना त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान अदा केले जाणार आहे, तर ज्यांच्याकडे जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना एकत्रित करून त्यांच्याकरिता २२४ ठिकाणी सामूहिक शौचालय उभारले जाणार आहेत. महापालिकेने त्यासाठी खासगी एजन्सीचीही मदत उपलब्ध करून दिली असून शौचालय उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र, झोपडपट्टी भागात सर्वाधिक लाभार्थी असून तेथील ड्रेनेज लाईनला सदर शौचालयांचे आउटलेट जोडण्यात आल्याने ड्रेनेजलाइनवर ताण पडून मलनिस्सारण व्यवस्था कोलमडून पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे स्वच्छ भारत अभियानअंतर्गत सदर योजनेची ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशी स्थिती बनली आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत पंचवटी विभागात सर्वाधिक १४८४ लाभार्थी निश्चित करण्यात आल्याने पुन्हा एकदा महापौर, उपमहापौरांच्या भागातच योजना वळविल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागला आहे. सिडकोत ६६४, नाशिकरोडला १३४१, नाशिक पश्चिम विभागात २६७, सातपूर विभागात २४३ तर पूर्व विभागात २१८ लाभार्थी निश्चित करण्यात येऊन आतापर्यंत ७३ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Drainage stress of toilets scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.