जुन्या नाशिकला नळातून थेट गटारीचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:06+5:302021-07-12T04:11:06+5:30
नाशिक : जुन्या नाशिकमधील शिवाजी रोड, ठाकरे रोड, वावरे लेन, पिंपळ चौक ते दूध बाजारसह भद्रकाली परिसरात रविवारी ...
नाशिक : जुन्या नाशिकमधील शिवाजी रोड, ठाकरे रोड, वावरे लेन, पिंपळ चौक ते दूध बाजारसह भद्रकाली परिसरात रविवारी नळातून थेट गटारीचे पाणी आल्याने महिलांसह नागरिकांनी संताप व्यक्त केला. कोरोना काळात आरोग्याचा प्रश्न आधीच बिकट झालेला असताना थेट गटारीचे पाणी नळातून आल्याबद्दल जुने नाशिकच्या बहुतांश भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
जुने नाशिक परिसरात गत आठवडाभरापासून सातत्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबतच्या तक्रारी होत्या. त्याबाबत जुनी तांबट लेन, संभाजी चौक, शिवाजी चाैक, तिवंधा लेन, टाकसाळ लेन, बडी दर्गा, पाटील गल्ली, नाव दरवाजा, सोमवार पेठ परिसरातील नागरिकांच्या वतीने महापालिकेला निवेदनेदेखील देण्यात आली होती. निवेदनात कुठे पाईपलाईन फुटलेली असल्यास मनपाच्या अधिकाऱ्यांनी ती त्वरित दुरुस्त करुन पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणीदेखील युवा सेनेच्या वतीने जिल्हा चिटणीस गणेश बर्वे यांनी केली होती. मात्र, तरीही पाण्याच्या दाबात कोणताच फरक पडलेला नव्हता. कमी दाबाने पाणी येत असल्याने आठवडाभर नागरिकांना पुरेसे पाणीदेखील भरता आले नव्हते. त्यातच रविवारी दुपारी जुने नाशिकच्या भद्रकालीसह आसपासच्या प्रमुख परिसरात नळाला थेट गटारीचेच पाणी आल्याने नागरिकांना पिण्यापुरते देखील पाणी उरले नाही. त्यामुळे काही भागातील नागरिकांना तर पिण्यासाठी देखील पैसे भरुन टँकरचे पाणी मागवावे लागले. त्यामुळे हेमा कराटे, कुंदा भागवत, अश्विनी बागुल, योगिता परदेशी, लता चंदरे यासह जुन्या नाशिकमधील महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.
इन्फो
काळेशार दुर्गंधीयुक्त पाणी
रविवारी सायंकाळी अगदी काळ्याशार रंगाचे दुर्गंधीयुक्त गढूळ पाणी येऊ लागल्याने पाणी भरणाऱ्या महिलांसह नागरिकांचा प्रचंड संताप झाला. कोरोना काळात रोगराईला निमंत्रण देणारे गटारीचे पाणी नळाला आल्याने मनपावरच मोर्चा काढून त्यांनाच हे पाणी प्यायला देऊया, अशा शब्दात महिलांनी त्यांचा रोष व्यक्त केला.
इन्फो
भोंगळ कारभाराबाबत नाराजी
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी महिला वर्गाने नळाला आलेले गढूळ पाणी बाटल्यांमध्ये भरुन सोमवारी महापालिकेतच नेऊन देणार आहे, अशा तीव्र शब्दात त्यांच्या भावना व्यक्त केल्या. यापूर्वी वारंवार तक्रारी करुनही त्याकडे लक्ष न देणाऱ्या मनपाच्या भोंगळ कारभाराबाबत नाराजी व्यक्त करुन त्वरित दुरुस्ती करुन पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
फोटो
११ नळाचे काळे पाणी
११ बाटलीतील पाणी
११ पाणी भरताना