‘सती न गेलेली महासती’ हे नाटक पराक्रमी राज्यकारभाराचा उलगडला संघर्षपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 01:08 AM2017-11-13T01:08:51+5:302017-11-13T01:09:35+5:30
चातुर्य, धाडस आणि श्रद्धा या त्रिवेणी गुणांच्या धनी असलेल्या अहल्याबाई होळकर यांनी केलेला राज्यकारभार आणि सामाजिक जाणिवेतून उभारलेले कार्य यावर प्रकाशझोत टाकतानाच कुटुंबातून स्त्रीला सन्मान मिळाला तर स्त्री कसे नेतृत्व करू शकते.
नाशिक : चातुर्य, धाडस आणि श्रद्धा या त्रिवेणी गुणांच्या धनी असलेल्या अहल्याबाई होळकर यांनी केलेला राज्यकारभार आणि सामाजिक जाणिवेतून उभारलेले कार्य यावर प्रकाशझोत टाकतानाच कुटुंबातून स्त्रीला सन्मान मिळाला तर स्त्री कसे नेतृत्व करू शकते, असा संदेश देणारे ‘सती न गेलेली महासती’ हे नाटक राहीप्रेरणा फाउंडेशनने सादर केले. रंगमंचावर होळकरांचे उभे केलेले चरित्र प्रेक्षकांना ऐतिहासिक काळाची आठवण देऊन गेला.
महाराष्टÑ शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने महाराष्टÑ राज्य नाट्य महोत्सवांतर्गत प. सा. नाट्यमंदिर येथे राही-प्रेरणा फाउंडेशनच्या वतीने अहल्याबाई होळकर यांच्या जीवनावरील ‘सती न गेलेली महासती’ हे नाटक सादर केले. माधवी संजय शिंदे यांनी लेखन आणि अभिनयाचीही जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनीच अहल्याबाई होळकर यांची व्यक्तिरेखा साकारली आहे, तर दिग्दर्शक हेमंत गव्हाणे यांनी दिग्दर्शनाबरोबरच सुभेदार मल्हारराव होळकर आणि पेशवे राघोबादादा साकारले आहे. संगीत भूषण भावसार यांचे असून, प्रकाश योजना ईश्वर जगताप, वेशभूषा निशा काथवटे, तर नेपथ्य संजय शिंदे यांनी केले. नाटकात पेशवे बाजीराव, गुप्तहेर आणि पंडित या भूमिका रमाकांत वाघमारे, गंगाबा तात्या-महेश खैरनार, खंडेराव, शिरपत आणि कवी अनंत फंदी या भूमिका संजय महाले, गौतमाबाई-निशा काथवटे, हरकुबाई-हेमांगी ठाकूर, मुक्त आणि दासी-दीक्षा अहिरे, धर्मा-राजेंद्र चिंतावार, शिवाई-रचना चिंतावार आदिंनी यात भूमिका साकारल्या आहेत. नृत्य दिग्दर्शन डॉ. अजय भन्साळी यांनी केले. जयसिंग शेंडगे आणि बापूसाहेब शिंदे यांचे या नाटकाला विशेष सहकार्य लाभले.