नाटक हे सामाजिक माध्यम: प्रेमानंद गज्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 01:04 AM2018-12-15T01:04:29+5:302018-12-15T01:04:51+5:30
मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबविले पाहिजे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे.
नाशिक : मराठी नाटक जगाच्या पाठीवर कुठेही होत असेल किंवा पूर्वी झाले असेल तर त्याचाही विचार आपण केला पाहिजे. त्याचा हेतू असा की, मराठी माणसं तेव्हा काय करीत होती? त्या-त्या काळातले सामाजिक आणि सांस्कृतिक आयाम काय होते, हे समजण्यासाठी नाटक हे उत्तम माध्यम आहे. त्यामुळे रंगभूमीकडे केवळ मनोरंजन अशा संकुचित दृष्टीने बघणे आधी थांबविले पाहिजे, असे प्रतिपादन ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी केले आहे.
सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्यातर्फे मु. शं. औरंगाबादकर सभागृहात शुक्रवारी (दि.१४) ग्रंथालय सप्ताहाच्या शुभारंभप्रसंगी मराठी रंगभूमी स्थिती-गती विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्यासह प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, ग्रंथ सचिव बी. जी. वाघ, नाटककार दत्ता पाटील, कार्याध्यक्ष धर्माजी बोडके उपस्थित होते. प्रेमानंद गज्वी म्हणाले, नाटक हे फार गंभीर माध्यम आहे. रंगभूमीचा हेतू आहे जो प्रामुख्याने प्रबोधन आहे, हे विसरून चालणार नाही.
आपण मराठी नाटकाची परंपरा सांगतांना विष्णुदास भावेंपासून सांगतो. खरंतर त्यांच्या आधीही कर्नाटकामध्ये मराठी रंगभूमी होती. त्याचाही उल्लेख आपण केला पाहिजे. रंगभूमीबद्दल आपण फार विचार करत नाही, असा गंभीर विचार करून गंभीरपणे नाटक लिहिणारी नाटककार मंडळी शोधावी लागतील. जे नवीन प्रश्न निर्माण झालेत, त्यावर नाटकाच्या माध्यमातून आज भाष्य करणारे कोण डोळ्यासमोर येतात? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
दरम्यान, ९९व्या अखिल मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सावनातर्फे नाटककार दत्ता पाटील यांच्या हस्ते प्रेमानंद गज्वी यांचा नागरी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक श्रीकांत बेणी यांनी केले, तर सूत्रसंचालन शंकर बोºहाडे यांनी केले.
सध्याचे नाटक पुरेसे गंभीर नसल्याची खंत
सध्याच्या स्थितीत होणाऱ्या उलथापालथींवर कुणी नाट्यभाषेतून व्यक्त झालेय का? असा प्रश्न उपस्थित करतानाच व्यावसायिक रंगभूमीला पर्याय म्हणून अगदी विजय तेंडुलकरांच्या काळापर्यंत प्रायोगिक रंगभूमीचा पर्याय म्हणून विचारही केला गेलेला नाही, काही ठोस उभेही केले गेले नाही. त्यामुळे प्रायोगिक रंगभूमी आपोआप व्यावसायिक रंगभूमीत विलीन होत गेली. या दृष्टीने विचार करणारे लोक आपल्याकडे नाहीत असे नाही, पण पुरेसे गंभीर नाहीत त्यामुळे सध्याचे नाटकही पुरेसे गंभीर नसल्याची खंत प्रेमानंद गज्वी यांनी यावेळी व्यक्त केली.