एक लाखाच्या दागिन्यांवर डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:17 AM2019-03-23T00:17:40+5:302019-03-23T00:17:54+5:30
‘मूळ कागदपत्रे आणि दागिनेसोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवित भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे एक लाख सात हजारांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नाशिक : ‘मूळ कागदपत्रे आणि दागिनेसोबत आणा, तुम्हाला पेन्शन चालू करून देतो’ असे आमीष दाखवित भामट्याने एका ज्येष्ठ महिलेचे सुमारे एक लाख सात हजारांचे दागिने घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी संश्यित भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारात ठक्कर बाजार व्यावसायिक संकुलात असलेल्या एका गाळ्याजवळ चांदवड येथील रहिवासी असलेल्या दिलारा इश्तियाक घासी (६५) या महिलेला संशयित भामट्याने बोलविले. तेथे अज्ञात व्यक्तीने घासी यांना एका रिक्षात बसविले. त्यांना विविध शासकीय योजनांची माहिती सांगत विश्वास संपादन करून पेन्शन सुरू करून देण्याचे आमीष दाखविले. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये आवश्यक असल्याचे सांगत त्या ज्येष्ठ महिलेजवळील ७५ हजार रुपयांची तीन तोळे वजनाची सोनसाखळी, सात हजार रुपयांचे कानातील आभूषणे, १२ हजार ५०० रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पोत, तसेच पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण १ लाख ७ हजार रुपयांचे दागिने घेऊन पोबारा केल्याचे फिर्यादित म्हटले आहे. अज्ञात भामट्याचे वर्णन महिला घाबरली असल्यामुळे सांगू शकलेली नाही. तसेच महिलेने रिक्षाचा क्रमांकदेखील बघितला नसल्याने या भामट्याची ओळख पटविणे अवघड होत आहे; मात्र अशाप्रकारे गुन्हे करणाऱ्या व्यक्तींचा गोपनीय माहितीच्या आधारे शोध सुरू केला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांनी दिली.