घर खरेदीचे स्वप्न झाले सोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:16 AM2021-02-24T04:16:07+5:302021-02-24T04:16:07+5:30
नाशिक : कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवतल व विविध बँकांनी व्याजदरात केलेली लक्षणीय कपात ...
नाशिक : कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था सावरण्यासाठी सरकारने मुद्रांक शुल्कात दिलेली सवतल व विविध बँकांनी व्याजदरात केलेली लक्षणीय कपात यामुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढली आहे. त्याचा परिणाम घर खरेदीकडे ग्राहकांच्या वाढलेल्या कलाच्या माध्यमातून दिसून येत आहे. त्यामुळे नाशिकमधील बांधकाम उद्योगालाही बूस्ट मिळाला आहे.
काेराेनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या लाॅकडाऊन व त्यातच वर्क फ्राॅम हाेम या रुढ झालेल्या संकल्पनेमुळे अनेकांना बहुतांश वेळ कुटुंबासाेबत घालविता आला. यातूनच आपल्या स्वत:च्या मालकीचे व प्रशस्त घर असावे अशी इच्छा लाेकांच्या मनात बळावली असल्याचे बाजारातील घरांच्या इन्क्वाॅयरीवरून लक्षात येते. त्यातच ऐतिहासिक पातळीवरील निचांकी गृहकर्जाचे दर निचांकी स्तरावर पोहोचले आहे. त्यामुळे नाशिककरांना त्यांच्या स्वप्नातील हक्काचे घर खरेदी करणे आता सहज शक्य झाले आहे. काेराेना अनलाॅकनंतर अर्थव्यवस्था रुळावर परत यावी याकरिता सरकार आणि रिझर्व्ह बँकेने संयुक्त प्रयत्न सुरू केले, त्याचाच भाग म्हणून तब्बल तीन वेळा ०.२५ टक्क्यांनी रेपाे रेट कमी केले गेले. याचाच परिणाम म्हणून ७.८० टक्क्यांपर्यंत गृहकर्जाचे दर खाली आले आहेत. त्यामुळे स्वप्नातील घर खरेदी आवाक्यात आल्याने अनेक नागरिकांकडून घराचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न होत आहे.
इन्फो-
मुद्रांक शुल्क सवलतीला उरला एक महिना
घर खरेदी करताना माेजावे लागणारे पाच टक्के मुद्रांक शुल्क म्हणजे, माेठा आर्थिक भार मानला जाताे. मात्र राज्य शासनाने १ सप्टेंबर २०२० पासून मुद्रांक शुल्कामध्ये तीन टक्के सवलत दिली होती. तर १ जानेवारी ते ३१ मार्चपर्यंत ही सवलत दाेन टक्के आहे. यामुळे माेठा आर्थिक भार कमी हाेत असल्याने लाेकांचा घर खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही सवलत संपायला अवघा अवघा एक महिना उरला असून अनेकजण घर खरेदीचा निर्णय तत्काळ घेण्याचा विचार करीत असल्याने बांधकाम व्यवसायात उत्साहाचे वातावरण आहे.
इन्फो
एप्रिलनंतर घरे महागण्याची शक्यता
मार्चनंतर मुद्रांक शुल्कातील सवलत संपणार आहे. तसेच रेडीरेकनरचे दर देखील ७ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढतील अशी भीती व्यक्त हाेत आहे. असे झाले तर घरांच्या किमती ८ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय स्टिल आणि सिमेंटचे दर सध्या अवास्तव वाढत असून वाढलेली मजुरी यामुळे घरांच्या किमतीही वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे ग्राहकांकडून मार्च अखेरपूर्वीच घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत.
इन्फो-
पहिल्या घरासाठीच्या अनुदानाचा हजाराेंना फायदा
पहिले घर खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हातभार लावला जात असून अनुदानाच्या स्वरूपात २.६५ लाख रुपयांपर्यंतची रक्कम गृहकर्जाच्या थेट मुद्दलात जमा हाेेत आहे. यामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता थेट दाेन ते अडीच हजार रुपयांनी कमी हाेत असल्याने स्वत:च्या घराचे स्वप्न साकारतानाच मासिक बजेट बसवणे लाेकांना शक्य हाेत आहे. या याेजनेचा शहरात आतापर्यंत हजाराे ग्राहकांना फायदा मिळाला आहे.
इन्फो-
मुद्रांक शुल्क कपातीनंतर दस्त नोंदणी
महिना - दस्त नोंद - महसूल ( रुपयांमध्ये )
सप्टेंबर - ११,४७२ - ५३ कोटी ६५ लाख
ऑक्टोबर - १३,३७२ - ६८ कोटी २१ लाख
नोव्हेंबर - १२,५७८ - ५५ कोटी ७० लाख
डिसेंबर - २१००२- १८७ कोटी २८ लाख
जानेवारी - १४५४८- ८४ कोटी ८१ लाख