राममंदिर निर्माणाचे देशाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार - श्री.श्री. रविशंकर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:46 PM2019-10-29T22:46:03+5:302019-10-29T22:47:32+5:30
भाऊबीज-दीपावली मिलन' च्या सोहळ्यात तापोभूमीत उसळला भक्तांचा जनसागर
नाशिक : आपल्याला परमेश्वर जी संकटे आणि समस्या देतो, ती आपली क्षमता बघून, त्यामुळे एखाद्या प्राण्याच्या शेपटीसारखी ही संकटे अन समस्या असतात. प्राणी जशी सहज आपली शेपटी पाहिजे तशी हलवू शकतो, अगदी त्याचप्रमाणे मनुष्यदेखील आपल्या समस्यांवर मात करू शकतो. सकारात्मक विचार अन अन ईश्वर भक्तीने न डगमगता संकटांचा मुकाबला करा, असा गुरुमंत्र द आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री.श्री.रविशंकर महाराज यांनी केले.
निमित्त होते, आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने नाशिकमधील तापोभूमीच्या 'साधुग्राम' मैदानावर आयोजित 'भाऊबीज-दीपावली मिलन' सोहळ्याचे. भाऊबीजेच्या मुहूर्तावर दोन दिवसीय सोहळ्याचा प्रारंभ लक्ष्मी हवनने आज मंगळवारी (दि.29) करण्यात आला. या सोहळ्याला संपूर्ण राज्यातून गुरूदेव यांच्या अनुयायांची अलोट गर्दी लोटली होती. श्री.श्री.यांनी आपल्या प्रवचनाची सुरुवात 'माझे माहेर पंढरी...' या भजनाने केली. भाजनाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या खास शैलीत 'विठ्ठल-विठ्ठल...'चा नामजप तालासुरात करताच उपस्थित भाविकांच्या जनसागराने जणू पंढरीत माऊलीच्या दरबारात पोहचून आपण विठुरायाची भक्ती करत असल्याचा अनुभव घेतला. त्यांनतर श्री श्री. यांनी उपस्थित हजारो भक्तांना उद्देशून आपला संदेश देताना सांगितले, केवळ मनुष्य प्राण्यालाच संकटे, समस्यांचा सामना करावा लागतो, असे अजिबात नाही. भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांच्याही जीवनात संकटे होतीच. समस्या कधीही डोंगरएव्हढी मोठी नसते, मनुष्य तीचा तसा विचार करतो, आणि त्याविषयी आपल्या मनात तसे स्वरूप निर्माण करून घेतो. त्यामुळे तो हारूण अपयश आपल्या पदरी पाडून घेत असतो. मनुष्याने आपले ज्ञान वाढवून आध्यत्मिक शक्ती विकसित करायला हवी, असेही श्री श्री यावेळी म्हणाले. जीवनाला उत्सव बनवायचे असेल तर ज्ञान आवश्यक आहे. सतत हास्य फुलवत ज्ञानाच्या जोरावर मार्गक्रमण करत रहा. आपल्याशी जे चांगले कर्म होऊ शकतात ते आवर्जून करावे, असा उपदेश त्यांनी यावेळी बोलताना केला.
प्रवचनाची सांगता श्री श्री यांनी उपस्थित भक्तांना दीपावली आणि भाऊबीजेच्या शुभेच्छा देत केली. कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर माजी मंत्री अनिल मोंढे, खासदार भारती पवार, आमदार सीमा हिरे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे विजय हाके यांसह आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री श्रीं ना 20 हजार दिव्यांनी अभिवादन
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने उपस्थित भक्तांच्या जनसागरात दिव्यांचे ताट पोहचविले गेले, यावेळी सुमारे 20 हजार दिव्यांनी उपस्थित भाविकांनी श्री श्री यांना अभिवादन केले. यावेळी श्री श्री यांनी ज्यांच्यापर्यंत दिवे पोहोचले नाही, त्यांनी आपल्या मोबाईल चा वापर करायला हरकत नाही असे सांगितले. यावेळी शेकडोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी मोबाईलची बॅटरी सुरू करत मोबाईल हलवित 'लख लख चंदेरी...' या भजनावर मुग्ध होत गुरूंना अभिवादन केले. यावेळी श्री श्री यांनी ही व्यासपीठाला जोडून थेट काही मीटर पर्यंत तयार करण्यात आलेल्या 'रॅम्प' वर चालत भक्तांमध्ये जाऊन त्यांच्या दिशेने पुष्पोत्सव करत आपला आशीर्वाद दिला.
नाशिकच्या कारागृहात 'कौशल्य विकास केंद्र'
नाशिक मध्यवर्ती कारागृहात बंदीवाणांसाठी लवकरच आर्ट ऑफ लिव्हिंग एक कौशल्य विकास केंद्र सुरू करत आहेत. त्यासाठी लागणारी कागदपत्रे सादर केली गेली आहे, अशी घोषणा देखील यावेळी व्यासपीठावरून आर्ट ऑफ लिव्हिंगकडून करण्यात आली.
'अयोध्या'ची गुड न्यूज लवकरच
प्रभू रामचंद्र यांच्या भूमीत त्यांचे राममंदिर निर्माणाचे देशाने बघितलेले स्वप्न लवकरच सत्यात उतरणार असून त्याबाबचा 'फैसला' झाला आहे. निकालाच्या रूपाने लवकरच गुड न्यूज आपल्यापर्यंत पोहचणार असल्याचेही श्री श्री यावेळी म्हणाले.
'वेणूनाद'नंतर दुसऱ्यांदा तापोभूमीत
श्री श्री रविशंकर हे नाशिकमधील तापोभूमीत 'वेणूनाद' नांतर दुसऱ्यादा आले. यापूर्वी वेणूनाद संगीताचा कार्यक्रम झाला होता त्यावेळी श्री श्री नाशिकमध्ये येऊन आपल्या अनुयायांना भेटले होते.