मुरूम टाकलेल्या रस्त्यावरच खडी टाकून मलमपट्टी;
By Admin | Published: January 5, 2015 01:02 AM2015-01-05T01:02:57+5:302015-01-05T01:02:58+5:30
सुट्टीच्या दिवशी अभियंत्याकडून अशीही कर्तव्यनिष्ठा
वणी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील वणी-सापुतारा रस्त्यालगतच खडी ट्रॅक्टर ट्रॉलीत भरून जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील अंबानेर येथील मुरुम टाकलेल्या रस्त्यावर टाकण्याचा प्रकार उघडकीस आला. रविवारी सुटीच्या दिवशी अभियंत्याकडून हा प्रकार होत असल्याने परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.वणी-सापुतारा रस्त्याचे काम सुरू करण्याचे नियोजन असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याच्या कामासाठी रस्त्यालगत खडीचे ढिग टाकण्यात आले आहेत. या कामात रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास अग्रक्रम देण्यात आला आहे. दरम्यान सदरची खडी बेवारस समजून सुटीच्या दिवशी दिंडोरी पंचायत समितीचे स्थापत्य अभियंता हे मजुर लावून ट्रॅक्टरमध्ये खडी टाकल्याचे निदर्शनास आल्याने याबाबत त्यांना विचारणा केली असता सदरची खडी अंबानेर येथे खड्डे बुजविण्यासाठी घेऊन जात असल्याचे उत्तर त्यांनी दिले.दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याची खडी स्थापत्य अभियंता रविवारी घेऊन जाताता याची शहनिशा करण्याकरिता अंबानेरचे सरपंच शांतारम घुले यांना याबाबत विचारले असता त्यांनी माहिती दिली की, अंबानेर फाटा ते अंबानेर गाव हे दीड किलोमीटर अंतराचे डांबरीकरण जिल्हा परिषदेकडून करण्यात आले मात्र या रस्त्याची दुरवस्था झाल्याने दीड महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीने या ठिकाणी मुरूम टाकला मात्र सध्या पंचायत समितीच्या अभियंत्याकडून या ठिकाणी मुरुमावर खडी टाकून डांबर टाकण्याचे नियोजन आहे. वास्तविकता या ठिकाणी खडी टाकाण्यापूर्वीच मुरूम पूर्णत: काढून टाकणे गरजेचे आहे. याबाबत घुले यांनी संबंधितांना विचारणा करताच सदर काम असेच होणार असल्याचे उत्तर मिळाले.दरम्यान सार्वजनिक बांधकाम खात्याची खडी रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा परिषदेने केलेल्या रस्त्यासाठी वापरण्याची कामगिरी करण्याची संबधित अधिकाऱ्याला आवश्यकता काय? याबाबत माहिती घेण्यासाठी पंचायत समितीचे बांधकाम अभियंता मोगल यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही तो होऊ शकला नाही. (वार्ताहर)