दररोज अडीच लिटर पाणी प्या
By admin | Published: January 13, 2016 11:08 PM2016-01-13T23:08:35+5:302016-01-13T23:34:29+5:30
देवदत्त चाफेकर : निफाडला आरोग्यविषयक व्याख्यान
निफाड : मूत्रपिंड विकारापासून दूर राहावयाचे असेल तर प्रत्येकाने आरोग्य तपासणी करणे गरजेचे असून, दररोज सरासरी दोन ते अडीच लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन किडनी विकारतज्ज्ञ डॉ. देवदत्त चाफेकर यांनी केले.
निफाड नगरपंचायत व ग्रामस्थ, लायन्स क्लब, पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने निफाडभूषण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय शांतीलाल सोनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डॉ. देवदत्त चाफेकर यांचे ‘आपल्या किडनीची घ्यावयाची काळजी’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर डॉ. सहस्रबुद्धे, आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. विक्रांत जाधव उपस्थित होते. मानवी शरीरात दोन्ही मूत्रपिंड मिळून एक लाख चाळण्या असून, त्या रक्त शुद्ध करतात. मूत्रपिंड विकार झाल्यास डोळ्यावर, पायावर सूज येणे, उच्च रक्तदाब वाढणे ही लक्षणे दिसतात. अल्पकालीन अकार्यक्षम मूत्रपिंड विकार हा तात्पुरता असून, हा बरा करता येतो. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार हा चितेंचा विषय असून, यात डायलिसीस करणे, मूत्रपिंड प्रत्यारोपण करणे आदि उपाय करावे लागतात. डब्ल्यूएचओच्या रिपोर्टमध्ये १० पैकी एका व्यक्तीला मूत्रपिंड विकार झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे.
नियोजित स्वर्गीय शांतीलालजी सोनी डायलिसीस केंद्राच्या फलकाचे अनावरण डॉ. देवदत्त चाफेकर यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेचे आयोजक शशांक सोनी, राजेश सोनी, वि. दा. व्यवहारे, लायन्स क्लब, पंचवटीचे अध्यक्ष राजेश कोठावदे, देशपांडे, डॉ. नीलिमा जाधव, निफाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ शेलार, उपनगराध्यक्ष सुनीता कुंदे, नगरसेवक अनिल कुंदे, नगरसेवक देवदत्त कापसे, रतन पाटील, विद्यालयाचे प्राचार्य के. के. निकम, उपप्राचार्य व्ही.डी. अहेर, पर्यवेक्षक मालती वाघावकर, पर्यवेक्षक रेखा चौधरी आदिंसह नागरिक विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)