वाहनचालकांना १५ लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:12 PM2020-04-23T22:12:24+5:302020-04-24T00:15:31+5:30
नाशिक : लॉकडाउन कालावधीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली असून, आतापर्यंत १५ लाख ५ हजार दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
नाशिक : लॉकडाउन कालावधीत विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांनी कडक कारवाई केली असून, आतापर्यंत १५ लाख ५ हजार दोनशे रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी २२ मार्चला झालेल्या जनता कर्फ्युनंतर २३ पासून संपूर्ण देशात शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. लॉकडाउन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर नागरिकांना संचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे, असे असतानाही मिळेल ती संधी शोधून काहीही कारण सांगून अनेक युवक तसेच नागरिक दुचाकीवरून संचार करत आहेत. शहरात कोरोनाचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळ्यानंतर पोलिसांनी संचारबंदी अधिक कडक केली असून, प्रामुख्याने रुग्ण आढळलेल्या भागात प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी वाहने जप्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध पोलीस ठाण्यांनी मिळून तीनशेहून अधिक वाहने जप्त केली आहेत. गस्ती पथके सतत गस्त घालत असून, वाहतूक शाखेने वाहने जप्त करण्यासह अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार २३ मार्चपासून वाहनांवर कारवाई करत त्यांच्यावर १५ लाख ५ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी २ लाख ८३ हजार दोनशे रुपये दंड रोख स्वरूपात वसूल केला आहे. तर १२ लाख २२ हजार सहाशे रुपयांचे ई चलान कापण्यात आले आहेत. त्यानुसार वाहनचालकांना आॅनलाइन दंड करण्यात आला असून, त्याचे एसएमएस त्यांना पाठविण्यात आले आहेत.