वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:13 AM2021-05-26T04:13:48+5:302021-05-26T04:13:48+5:30

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सव्वा ते दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील वाहनांची चाकेही रुतल्यासारखी स्थिती आहे. ...

Driver's income decreased, expenses increased; How to run | वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

वाहनचालकांचे उत्पन्न घटले, खर्च वाढला; भागवायचे कसे?

Next

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सव्वा ते दीड महिन्यांपासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरातील वाहनांची चाकेही रुतल्यासारखी स्थिती आहे. व्यवहार आणि व्यवसायही बंद असल्याने मालवाहतूक करणारी वाहने उभी आहेत. त्यामु‌ळे वाहन चालक आणि सहायकांसोबतच वाहनांची देखभाल दुरुस्तीची कामे करणाऱ्या गॅरेजमधील कामगारांनाही रोजगार उरला नाही. हाताला कामच नसल्याने अनेकांना घर चालविणेही कठीण झाले आहे.

नाशिक महानगरात वाहनांची संख्या मोठी आहे. अनेकांचे कुटुंब या व्यवसायावर चालतात. मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत, व्यापार उद्योग क्षेत्रात कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असल्याने सर्व काही ठप्प झाले आहे. मालवाहतूक बंद असल्याने या क्षेत्रातील मजुरांना काम उरलेले नाही. तर वाहने उभी असल्याने गॅरेजचालकांना आणि गॅरेजमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही फटका बसला आहे. मॅकेनिक आर्थिक संकटात सापडले आहेत. एकीकडे वाहने उभी असल्याने वाहनांचे आणि टायरचे मेंटेनन्स वाढले आहे. तर दुसरीकडे वाहनांचे हप्ते थकले आहेत. गॅरेजचालक कामगारांचे वेतन नियमित करू शकत नसल्याने या क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो ड्रायव्हर, क्लिनर, मॅकेनिक यांच्यासमोर कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शहरात वाहने किती?

कार - १,२०, ५४३ जीप ४०, ३८० दुचाकी - ९, ७५,८५०

रिक्षा - १०, ७३५ स्कूल बस - ३,५००

रुग्णवाहिका २३२ ---

वाहने सुरू; पण गॅरेज बंद

शहरात वाहने मर्यादित स्वरूपात सुरू असली तरी गॅरेज मात्र बंद आहे. त्यामुळे वाहन नादुरुस्त झाल्यास वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागतो. वाहन रस्त्यावर उभे ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. वाहनचालकांना पंक्चरपासून तर वाहन दुरुस्तीपर्यंत अडचणीचा सामना करावा लागत असल्याने नागरिकांकडूनही वाहनांचा वापर मर्यादित झाल्याचे दिसून येत आहे.

--- वाहनचालकांसमोर अडचणींचा डोंगर

लॉकडाऊनमध्ये गॅरेज आणि स्पेअर पार्टची दुकानेही बंद आहेत. काही छोटे मोठे गॅरेज सुरू असले तरी तरी ते मोठ्या अडचणीत दुरुस्तीला कामी येणारे नाहीत. एखाद्या अडचणीत मॅकेनिक मिळाला तरी दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे वाहनचालकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

---

वाहतूक सुरू असली तर नादुरुस्त होणारी वाहने नियमित दुरुस्तीसाठी येत असतात. त्यावरच गॅरेजचे आणि मॅकेनिकचे उत्पन्न सुरू राहते. सध्या वाहतूक मर्यादित स्वरूपात सुरू आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी येणारी वाहनेही कमी झाली आहेत. असलेली वाहने सर्व्हिसिंगकडे कल असला तरी गॅरेज सुरू करता येत नसल्याने व्यवसाय ठप्प आहे. त्या गॅरेजमधील मॅकेनिक, कामगारांना कुटुंब चालविणेही कठीण झाले आहे.

- संदीप जाधव, गॅरेजचालक, नाशिकरोड

---

गॅरेज बंद असले तरी दुकानाचे, जागेचे भाडे, लाईट बिल यासारखे खर्च सुरूच आहे. मॅकेनिक, कामगारांनाही काही प्रमाणात का होईना उचल द्यावी लागत आहे. त्यामुळे गॅरेजचे बजेट कोलमडले असून व्यवसाय ठप्प असताना खर्च भागवायचा कसा, अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

- विक्रम राजोळे, गॅरेजचालक, पाथर्डी फाटा

----

---

लॉकडाऊनमुळे जवळपास दोन महिन्यांपासून ऑटोरिक्षा उभीच आहे. या व्यवसायावरच कुटुंब चालते. कधी तरी स्टँडवर रिक्षा उभी केली तरी प्रवासीच मिळत नसल्याने दिवसभर व्यावसाय होत नाही. पेट्रोलचा खर्चही परवडच नाही. उलट वाहन बाहेर काढून नादुरुस्त झाले तर ते दुरुस्तीसाठी मॅकेनिकही मिळत नाही. त्यासाठी अडचणींचा सामना कारावा लागतो.

- विलास साळवे, ऑटोचालक

----

मागील काही दिवसांपासून उद्योग, व्यापार बंद असल्याने माल वाहतुकीची गती मंदावली आहे. जी वाहने सुरू आहेत, त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी लॉकडाऊमुळे गॅरेज, मॅकेनिक उपलब्ध होऊ शकत नाही. चालकांना अडचणींचा सामना करावा लागतो, मालाची डिलिव्हरीही वेळेत होऊ शकत नाही. तर उभ्या वाहनांचा देखभाल, दुरुस्तीचा खर्चही परवडत नाही.

- गणेश सोनवणे, वाहनधारक

Web Title: Driver's income decreased, expenses increased; How to run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.