शिंदे टोलनाक्यावर वाहनचालकांना दमबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:17 AM2021-01-16T04:17:37+5:302021-01-16T04:17:37+5:30
नाशिक : शिंदे येथील नाशिक-पुणे महार्गावरील टोलनाक्यांवर वाहतूकदार आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून टोल प्रशासनाकडून वाहनचालकांना दमबाजी ...
नाशिक : शिंदे येथील नाशिक-पुणे महार्गावरील टोलनाक्यांवर वाहतूकदार आणि वाहनचालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून टोल प्रशासनाकडून वाहनचालकांना दमबाजी करण्याचा गंभीर प्रकार सुरू असल्याचा आरोप नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन (एनटीए) व नाशिक गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशन (एनजीटीए)तर्फे करण्यात आला आहे. यासंदर्भात एनटीएचे अध्यक्ष राजेंद्र फड व (एनजीटीए) अध्यक्ष पी. एम. सैनी यांच्याकडून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, टोल व्यवस्थापक यांना निवेदन दिले आहे.
नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे टोलनाका येथील गैरसोयींबाबत एनटीए व एनजीटीएकडून यापूर्वीही केंद्र व राज्य सरकारला निवेदने सादर केली आहेत. मात्र, टोल प्रशासनाची मुजोरीची सुरूच आहे. त्यामुळे वाहतूकदार त्रस्त झाले आहेत. टोलनाक्यावर फास्ट टॅगमधील तांत्रिक अडचणी येत असताना येथील कर्मचारी व अधिकारी वाहनांचे परमिट, मालाचे पेपर, लायसन्स ताब्यात घेऊन चालकालाही दमबाजी करत असल्याची तक्रार या दोन्ही संघटनांनी प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. काही दिवसांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांकडून चालकांना मारहाण झाल्याचे प्रकारही घडल्याचा आरोपही या संघटनांनी केला आहे. त्याचप्रमाणे टोल नाक्याजवळील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली असून याठिकाणी मूलभूत सुविधांचीच वानवा असून टोलनाका प्रशासनाकडून शासन नियमावलींची पायमल्ली होत असल्याचे अधोरेखित करत येथे स्वच्छतागृहांसह अन्य मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी एनटीए व एनजीटीए संघटनांनी केली आहे.
कोट-
तांत्रिक अडचणींमुळे अनेकदा फास्टटॅगद्वारे टोलवसुलीस विलंब होतो. अशाप्रकारानंतर वाहनचालक नाक्यावर काहीवेळ थांबण्यास तयार असला तरी टोल प्रशासन वाहनचालकांवर रोखीने टोल भरण्यास दबाव आणते. अनेकदा टोल कर्मचाऱ्यांकडून वाहनचालकांना दमबाजीही केली जाते. टोलनाक्यावर पुरेशा सोयी-सुविधाही उपलब्ध नसताना टोलप्रशासनचे अशाप्रकारचे वर्तन वाहतूकदारांसाठी त्रासदायक ठरते आहे.
- राजेंद्र फड, अध्यक्ष, नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन