शहरात पावसाची रिपरिप तर जिल्ह्यात दम ‘धार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:01 PM2020-08-06T15:01:15+5:302020-08-06T15:08:13+5:30
शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे.
नाशिक : शहरासह जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाला दमदार सुरुवात झाल्याने बळीराजासह सर्वच सुखावले आहे. मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने नागरिक हवालदिल झाले होते. हवामान खात्याकडून गुरुवारपर्यंत उत्तर-मध्य महाराष्टÑात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला होता. दोन दिवस कोरडे गेले; मात्र गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने समाधान व्यक्त होत आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात २४ मिमीपर्यंत पाऊस मोजला गेला. शहरातसुद्धा हलक्या व मध्यम सरींची संततधार सुरू असल्याने जनजीवन काहीसे प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे.
शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजाला मोठा दिलासा लाभला आहे. जिल्ह्यातील इगतपुरी, दिंडोरी, निफाड, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये पावसाचा सर्वाधिक जोर मध्यरात्रीपासून कायम आहे. दिंडोरी-७७, निफाड-५७, इगतपुरी-४६, पेठ-४६, त्र्यंबक-२३, बागलाण-२७ मिमी इतका पाऊस आज सकाळी ६ वाजेपर्यंत पडला. जिल्ह्यात सरासरी २४.६४ मिमी असा गुरुवारी पाऊस मोजला गेला. आतापर्यंत जिल्ह्याच्या पर्जन्यमान एकूण सरासरी ५२८.४२ मिमी असा राहिला आहे.
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रातसुद्धा पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. गंगापूर धरणाच्या परिसरात ३४, कश्यपी-३६,गौतमी-३४, त्र्यंबक-२४, अंबोली-४३ मिमी इतका पाऊस आज सकाळी ६ वाजेपर्यंत मोजला गेला. गंगापूर धरणात नव्याने ३८ दलघफू इतके पूरपाणी वाढले. यामुळे धरणाचा जलसाठा सकाळी ५२.६६ टक्के इतका झाला. आंबोली भागात पावसाचा जोर चांगला राहिला. दारणा धरणातून सकाळी १२०० क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला आहे. तसेच भावलीमधून ७०१ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शहरात सकाळपासून ढगाळ हवामान कायम असून, पावसाची रिपरिपदेखील सुरू आहे. शहरातील अहिल्यादेवी होळकर पुलाखालून पुढे गोदापात्रात २७८ क्यूसेक पाणी प्रवाहित आहे. रस्त्यांवर ठिकठिकाणी असलेल्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असून, अपघातांना निमंत्रण मिळत आहे. पावसाच्या संततधारेमुळे रिंगरोडसह शहराच्या बहुतांश रस्त्यांवर लहान-मोठे खड्डे पडले आहे.