जिल्ह्यातील ५६१ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:19 AM2021-08-21T04:19:49+5:302021-08-21T04:19:49+5:30
स्वामित्व योजना : गावठाण मोजणीसाठी जिल्ह्यातील १४२८ गावे पात्र नाशिक : विस्तारलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी गावठाणाची हद्द निश्चित होणे ...
स्वामित्व योजना : गावठाण मोजणीसाठी जिल्ह्यातील १४२८ गावे पात्र
नाशिक : विस्तारलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी गावठाणाची हद्द निश्चित होणे आवश्यक असते. तथापि, बहुतांश गावठाणांचे अभिलेख नसल्याने जमिनींचे व्यवहार करताना अनेक अडचणी निर्माण होतात. त्यातून वादाचेदेखील प्रसंग उभे राहतात. त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून आधुनिक पद्धतीने गावठाणाची मोजणी होणार असून, मालकीहक्क प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. नाशिक जिल्ह्यात अशाप्रकारे सुमारे ५६१ गावांचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
राज्यातील अनेक गावठाणांचे भूमापन झाले नसल्याने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून राज्यात गावठाण जमाबंदी प्रकल्प राबविला जात आहे. हीच योजना आता केंद्र शासनाकडून स्वामित्व योजना म्हणून स्वीकारण्यात आली असून गावांचे ड्रोन फ्लाईंगद्वारे सर्वेक्षण केले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील १४२८ गावे या योजनेसाठी पात्र आहेत. त्यापैकी ५६१ गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे.
महसूल, भूमिअभिलेख आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून सर्व्हे ऑफ इंडियाच्या मदतीने जिल्ह्यात हे सर्वेक्षण केले जात आहे. आत्तापर्यंत इगतपुरीतील ७७, देवळा येथील २३, सिन्नरचे ८२, येवला १०९ चांदवड ९२, दिंडोरीतील ९८ तर मालेगावमधील ९० गावांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरित तालुक्यांतील कामे लवकरच हाती घेतली जाणार आहेत. सर्वेक्षण झालेल्या इगतपुरी तालुक्यातील २२, देवळा तालुक्यातील ८, सिन्नर येथील ४१ तर येवला तालुक्यातील ५६ अशा १२७ गावांचे सर्व्हे ऑफ इंडियाकडून नकाशेदेखील प्राप्त झाले आहेत. दरम्यान, उर्वरित तालुक्यांमधील गावांचेदेखील लवकरच सर्वेक्षण हाती घेतले जाणार असल्याची माहिती भूमिअभिलेख जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांनी दिली.