निफाडला विनाकारण फिरणाऱ्यांवर ड्रोनची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 01:27 AM2021-04-23T01:27:22+5:302021-04-23T01:27:45+5:30
कोरोनाकाळात नागरिकांनी शहरात, रस्त्यांवर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे या उद्देशाने नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून निफाड पोलीस ठाण्यासाठी ड्रोन प्राप्त झाला आहे.
निफाड : कोरोनाकाळात नागरिकांनी शहरात, रस्त्यांवर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे या उद्देशाने नजर ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून निफाड पोलीस ठाण्यासाठी ड्रोन प्राप्त झाला आहे.
येथील शांतीनगर त्रिफुली येथे गुरुवारी (दि.२२) निफाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगराव सानप यांच्या उपस्थितीत या ड्रोनचे प्रात्यक्षिक संपन्न झाले. सदर ड्रोन हे निफाड शहरात कोरोनाकाळात वापरण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे हा या मोहिमेचा मूळ उद्देश आहे. या प्रात्यक्षिकप्रसंगी नाशिक येथील वायरलेस विभागाचे पोलीस निरीक्षक गोकुळ पवार पोउनि सूर्यवंशी, सपोउनि तांगडे, सपोउनि खरे या पथकाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी सुनील पवार, गोकुळ सूर्यवंशी, पोलीस कर्मचारी विलास बिडगर, दीपक पगार, मनोज अहेर, तुषार सोनवणे, ज्ञानेश्वर सानप, जयकुमार महाजन, सागर सारंगधर, भारत पवार, त्र्यंबक भारती, संदीप निचळ आदी उपस्थित होते.
अन्यथा, कारवाई करणार
निफाड शहरातील शांतीनगर, उगाव रोड, शिवाजी चौक, भाजी मंडई, कोळवाडी रोड व इतर मोठे चौक, गर्दीची ठिकाण या सर्व ठिकाणी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. या सर्व मोठ्या चौकांत, रोडवर ड्रोनद्वारे गर्दी करणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी शहरात विनाकारण गर्दी करू नये. मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, कोणीही नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.