लष्करी प्रशिक्षण केंद्रावर रात्रीच्या वेळी ‘ड्रोन’च्या घिरट्या! फायरिंग करणार तोच लष्करी केंद्राच्या हद्दीतून गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 10:25 AM2022-08-29T10:25:13+5:302022-08-29T10:25:53+5:30
Nashik News: नाशिक शहरातील सैन्याच्या अत्यंत संवेदनशील केंद्रांपैकी एक असलेले गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित क्षेत्रात ‘ड्रोन’ची घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नाशिक : शहरातील सैन्याच्या अत्यंत संवेदनशील केंद्रांपैकी एक असलेले गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित क्षेत्रात ‘ड्रोन’ची घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात ड्रोन कॅट्सच्या परिसरात घिरट्या घालताना जवानांना आढळून आले. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी ‘ड्रोन’वर फायरिंग करून पाडण्याचे आदेशही दिले होते; मात्र तोपर्यंत ड्रोन हद्दीतून बाहेर निघून गेले. याप्रकरणी शनिवारी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या पुणे महामार्गावरील गांधीनगर येथे आर्मी ट्रेनिंग कमान्डअंतर्गत आर्मी एव्हिएशनच्या प्रशिक्षणार्थ्यांना लढाऊ हेलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण या केंद्रात दिले जाते. ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कारप्राप्त हे केंद्र असून लढाऊ वैमानिक या ठिकाणी घडविले जातात. गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कॅट्सच्या हद्दीत अवघ्या ८००मीटर उंचीवर एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळून आले. ‘एअर ट्रॅफिक कंट्रोलरूम’मध्ये कर्तव्यावर असलेले ऑपरेटर जर्नेलसिंग यांनी त्वरित ड्रोनद्वारे होणारी ‘एअर ॲक्टिव्हिटी’ची माहिती वरिष्ठांना कळविली. फिर्यादी लष्करी जवान मनदीपसिंग ईश्वर सिंग यांना दिली. त्यांनी खात्री पटवून सुरक्षा अधिकारी लेफ्टनंट कर्नल व्ही. रावत यांना याबाबत कळवून फायरिंगद्वारे ड्रोन पाडण्याची परवानगी मागितली. याच वेळी ड्रोन कॅट्सच्या हद्दीतून बाहेर निसटला.
दरम्यान, याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडविल्याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनदीपसिंग यांनी फिर्याद दिली आहे.
दोन-तीन मिनिटे हद्दीत उड्डाण
- कॅट्सच्या हद्दीत अज्ञात इसमाकडून सुमारे दोन ते तीन मिनिटे ड्रोन उडविला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
- प्रतिबंधित क्षेत्र व ‘नो ड्रोन फ्लाइंग’ झोन
जाहीर केलेले असतानासुद्धा अशा पद्धतीने ड्रोनच्या घिरट्या हद्दीत आढळून आल्या
आहेत. याबाबत पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राकेश भामरे हे करीत आहेत.
पुन्हा दिसल्यास उडविण्याचे आदेश
त्याबाबत ले. कर्नल रावत यांना कळविले असता त्यांनी पुन्हा ड्रोनचा शिरकाव आढळून आल्यास ते फायरिंगद्वारे पाडून टाका, असे आदेशही दिले; मात्र पुन्हा ड्रोन दिसून आला नाही.