नाशिकमधील ‘डीआरडीओ’च्या संरक्षक भींतीजवळ ड्रोनच्या घिरट्या

By अझहर शेख | Published: September 25, 2022 02:30 PM2022-09-25T14:30:13+5:302022-09-25T14:30:29+5:30

नाशिक शहरात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालाच्या अखत्यारितितील विविध लष्करी अस्थापना कार्यरत आहेत.

Drones hovering near the protective wall of DRDO in Nashik | नाशिकमधील ‘डीआरडीओ’च्या संरक्षक भींतीजवळ ड्रोनच्या घिरट्या

नाशिकमधील ‘डीआरडीओ’च्या संरक्षक भींतीजवळ ड्रोनच्या घिरट्या

Next

नाशिक :

नाशिक शहरात भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालाच्या अखत्यारितितील विविध लष्करी अस्थापना कार्यरत आहेत. या लष्करी अस्थापनांचा परिसर प्रतिबंधित क्षेत्रासह नो ड्रोन झोन म्हणून घोषित केलेला आहे; मात्र तरीदेखील वारंवार अज्ञात ड्रोन अशा अस्थापनांच्या हद्दीत घुसखोरी करत असल्याचे प्रकार घडू लागले आहे. दहावा मैल परिसरात ‘डीआरडीओ’च्या संरक्षक भींतीजवळ ड्रोनच्या घिरट्या आढळून आल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली.

आडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील माळोदे वस्ती गट क्रमांक-१२०३ हा परिसर डीआरडिओ कार्यालयाच्या (डिफेन्स रिसर्च ॲन्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन) भिंतीजवळ आहे. हा संपुर्ण भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. या कार्यालयाच्या संरक्षक भींतीच्याजवळ शुक्रवारी (दि.२३) सायंकाळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने विनापरवाना ड्रोनचे उड्डाण केल्याची घटना घडली.

डीआरडिओ कार्यालयाच्या भिंतीजवळ माळोदे वस्तीच्या परिसरात पाचशे मीटर क्षेत्र पुर्णतः प्रतिबंधित असतांना कोणीतरी अज्ञात ड्रोन चालकाने विना परवाना परिसरात ड्रोनचा संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास शिरकाव केला. डीआरडीओच्या सुरक्षा चौकी क्रमांक-२जवळ ड्रोन दिसून आला. याप्रकरणी डीआरडीओच्या एन.जी.ओ वसतीगृहात राहणारे कर्मचारी अमोल जयवंत मोरे (३७) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध विना परवाना ड्रोन उडविल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘कॅट्स’च्या घटनेची पुनरावृत्ती

पुणे महामार्गावरील गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या (कॅट्स) हद्दीत अशाचप्रकारे २५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात ड्रोनच्या घिरट्या आढळून आल्या होत्या. याप्रकरणी लष्करी अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हादेखील नोंदवून घेतला गेला; मात्र या गुन्ह्याच्या तपासाला गती येण्याऐवजी तो महिनाभरात अधिकच थंडावला. त्यानंतर पुन्हा आता शुक्रवारी (दि.२३) अशाचप्रकारे एका अज्ञात व्यक्तीने पुन्हा ड्रोन थेट डीआरडीओच्या सुरक्षा चौकीपर्यंत प्रतिबंधित क्षेत्रात धाडला. यामुळे लष्कराशी संबंधित अतीसंवेदनशील अस्थापनांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Drones hovering near the protective wall of DRDO in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक