दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 05:54 PM2018-10-11T17:54:43+5:302018-10-11T17:55:02+5:30
सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे.
सिन्नर : तालुक्यात अत्यल्प पावसाचे प्रमाण व गंभीर दुष्काळी परिस्थिती या दोन्ही निकषात तालुक्याचा समावेश झाल्यानंतर आता पीक नुकसानीचे सर्वेक्षण करण्यासाठी दुष्काळी सत्यमापन चाचणीस प्रारंभ झाला आहे. त्यानुसार तालुक्यातील १३ गावांची निवड करण्यात आली असून तेथे पीक नुकसानीची खातरजमा करण्यात येत आहे.
७ आॅक्टोबर २०१७ च्या शासननिर्णयानुसार दुष्काळ जाहीर करण्यासाठी घालून दिलेल्या निकषांची चाचपणी करण्यासाठी शासनस्तरावरुन हालचाली गतिमान झाल्या आहेत. अल्प पर्जन्यमान व त्यामुळे निर्माण झालेली गंभीर स्थिती आणि ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान या तीन निकषांच्या आधारे शासन दुष्काळ जाहीर करते. त्यात पहिल्या दोन निकषात तालुका बसला असून, तिसऱ्या निकषातही खरिप पिकांचे नुकसान ३३ टक्कयांपेक्षा अधिक आहे. मात्र त्याची खातरजमा करण्याचे काम कृषी आयुक्त व जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आले आहे. महसूल विभागातील मंडळ अधिकाºयांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या पथकात कृषी सहाय्यक, तलाठी व ग्रामसेवकांचा समावेश करण्यात आला आहे.
पथकातील सदस्य प्रत्यक्ष शेतात जाऊन पीक नुकसानीची पाहणी करत आहे. शेतातील पावसाअभावी खरोखरच किती टक्के पीक हे बाधित झालेले आहे याची निश्चिती केली जाणार आहे.
तालुक्यातील विंचूरदळवी येथे पीक नुकसानीच्या पाहणीसाठी आलेल्या अधिकाºयांनी सोयाबीनच्या शेतात पीक कापणी प्रयोग केले. त्यात एकरी सरासरी दीड क्विंटल एवढे अल्प उत्पादन निघाले. प्रत्यक्षात एकरी सात ते आठ क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळणे अपेक्षीत असते. त्यामुळे तालुक्यात खरीप उत्पादनही मोठ्या प्रमाणात घटल्याचे चित्र आहे. विंचुरदळवी येथे सोयाबिन, मका, भात यांची पाहणी ग्रामविकास अधिकारी संजय गिरी, कृषी सहायक महेशकुमार गरुड, तलाठी कविता गांगुर्डे, ग्रामपंचायत सदस्य शांताराम दळवी, भास्कर चंद्रे,बी. के. दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब भोर, नंदू भोर यांनी केली. शेतात जाऊन नुकसानीची मोजमाप करण्यात आले.