टंचाईबरोबरच नियोजनाचा दुष्काळ

By admin | Published: May 14, 2016 10:55 PM2016-05-14T22:55:48+5:302016-05-15T00:36:10+5:30

कळवण : एकही टँकर सुरू नसलेला एकमेव तालुका

Drought with the scarcity of planning | टंचाईबरोबरच नियोजनाचा दुष्काळ

टंचाईबरोबरच नियोजनाचा दुष्काळ

Next

 मनोज देवरे  कळवण
शासनाच्या कागदावर कळवण तालुका सुजलाम्, सुफलाम् आणि पाण्याने विविधतेने नटलेला संपन्न व सधन तालुका आहे, परंतु वास्तव वेगळेच आहे. ज्या आदिवासी बांधवांनी तालुक्यात जलाशयाचे प्रकल्प व्हावेत यासाठी प्रयत्न केले. त्याच आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. शासकीय यंत्रणेचे उंबरठे झजविण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. तालुक्याच्या आदिवासी भागातील अनेक गावांना पिण्यासाठी पाणी नाही. दोन - चार किलोमीटरच्या परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरींना थोडेफार पाणी आहे; मात्र गावाच्या पाणीपुरवठा योजनांच्या विहिरी कोरड्या पडल्याने पाण्यासाठी दाही दिशा भटकण्याची वेळ या भागातील ग्रामस्थांवर आली आहे. दुष्काळाच्या झळा अल्प असल्याने शासकीय व प्रशासकीय यंत्रणेच्या कागदावर कळवण हा तालुका इतर टंचाईग्रस्त तालुक्यांच्या तुलनेत बरी परिस्थिती असलेला आहे; पुनंद आणि ओतूर खोऱ्यातील डोंगर-कपारीतील आदिवासी वस्ती-पाडे या गाव-वस्तींना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे.
या ग्रामपंचायतींच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत; परंतु विहीर तसेच विंधन विहिरींना पाणी नाही. कारण या भागातील नैसर्गिक जलस्रोत नदी-नाले, बंधारे, तलाव, पाणी अडवून जिरवण्याचे छोटे बंधारे, विहिरी कोरडेठाक पडले आहेत, ही तालुक्याची आजची वस्तुस्थिती आहे. पाण्याचे स्रोत आटल्याने त्याचा परिणाम शेती क्षेत्राला आणि त्यावर अवलंबून असलेल्या मनुष्यबळ, शेतीपूरक व्यवसायांना भोगावे लागत आहे. हाताला काम नसलेले हजारो शेतमजूर बेकार झालेले आहेत. त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत पिण्यासाठी ग्लासभर तरी पाणी मिळवावे तर त्यासाठी वणवण करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. टंचाईच्या मोठ्या झळा कळवण तालुक्यामध्येही बसत आहेत. पाण्याची झळ बसणारे नागरिक टँकरची मागणी करत आहेत, तर शासन विहीर अधिग्रहणावर भर देत आहे. जवळील शेतात पाणी सुरू झाले की, घरात असेल-नसेल तेवढी रिकामी भांडी भरून घेण्यासाठी सर्वांची धावपळ उडते. या गावातील नागरिकांचा दिनक्र म पाण्याभोवती केंद्रित झाला आहे. पाणी आपल्याला मुबलक मिळाले पाहिजे, अशी मानसिकता झाली आहे. पण विखुरलेल्या लोकवस्त्यांवर आळी-पाळीने दररोज पाणी पुरवताना ग्रामपंचायतींनादेखील कसरत करावी लागत असून, या परिस्थितीला तोंड देताना यंत्रणेच्या नाकीनव आले आहेत. ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेद्वारे दर दिवशी अर्धातास पाणी दिले जाते. काही भागात मिळते तर काही भागात तेही मिळत नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना आपल्यावर पाणी पुरवताना अन्याय होत असल्याची भावना वाढीस लागत आहे. तर अनेकदा नळाच्या पाण्यावरून नागरिकांमध्ये भांडणे होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावातील पाण्याचे स्रोत
दुरूस्ती कामात घोळ झाल्याने पावसाळ्यात यात जमा होणारे पाणी हिवाळ्याच्या मध्यात झिरपून वाया जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरी, आड यांच्या भूजल पातळीत भर पडली नाही. परिणामी भोवताली पाणी असूनही पिण्यास पाणी नाही, अशी एकंदरीत तालुक्याची स्थिती झाली आहे.

Web Title: Drought with the scarcity of planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.