देवळा तालुक्यात दुष्काळी स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:26 PM2018-10-23T13:26:49+5:302018-10-23T13:27:11+5:30
देवळा : अत्यल्प पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ठ ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे.
देवळा : अत्यल्प पावसामुळे तालुक्याच्या पूर्व भागात खरीप पिके पूर्णपणे वाया गेल्यानंतर रब्बीचा हंगाम देखील आता घेता येणार नाही, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक अरिष्ठ ओढवले असून आगामी दुष्काळातील भयावह परिस्थितीचे चटके बसण्यास सुरूवात झाली आहे. विहीरींनी तळ गाठण्यास सुरूवात केली आहे. शेतात असलेली पीके देखील हाती येण्याची आता शाश्वती राहीलेली नाही. शासनाने पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच तालुक्यातील धरण, बंधारे, पाझर तलाव आदीतील पाणी साठे आरक्षित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रामेश्वर येथील किशोर सागर धरण,वाजगाव येथील के.टी. वेअर, कनकापूर, वार्शी धरणात पाणी असल्यामुळे परिस्थिती थोडीफार बरी आहे. उमराणे येथील परसुल, दहिवड येथील चिंचलवण धरणात अत्यल्प पाण्याचा साठा असून तो पिण्यासाठी आरक्षित होणे आवश्यक आहे. अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजना या धरणातील पाण्यावर अवलंबून आहेत. मेंढपाळ व गुराख्यांना आपल्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातील पाण्यावर अवलंबून रहावे लागते. परंतु अवैध पाणी उपशामुळे लवकरच पाण्याचे हे स्त्रोत कोरडे होउन नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. पाण्याच्या टंचाईमुळे उन्हाळी कांदा लागवडीवर गंभीर परिणाम होणार आहे. परतीच्या पावसाच्या भरवशावर शेतकºयांनी उन्हाळी कांद्याचे बियाणे शेतात टाकले आहे. परंतु पावसाच्या हुलकावणीमुळे उन्हाळी कांदा लागवड आता अशक्यप्राय झाली आहे. सुरूवातीला लागवड केलेल्या पोळ कांद्यावर पडलेला करपा, चाळीत साठवणुक केलेला उन्हाळी कांदा सडल्यामुळे झालेले नुकसान आदी कारणांमुळे कांद्याचे बाजारभाव चांगलेच वधारले आहेत. यामुळे शेतकरी वर्ग कमी दिवसात येणाºया रांगडा कांदा लागवडीकडे वळला असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात लागवड सुरू आहे. परंतु कांद्याच्या रोपांची टंचाई निर्माण झाल्यामुळे शेतकºयांना रोपे मिळविण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. कांद्याच्या रोपांना सोन्याचे मोल प्राप्त झाले आहे. रांगडा कांदा लागवड केल्यापासून तो काढणीला यईपर्यंत पाणी पुरेल का?याबाबत कोणतीही शाश्वती नसतांना थंडी पडल्यानंतर कमी पाण्यात कांदा निघून येईल ह्या आशेवर शेतकरी नशिबाचा खेळ खेळत आहेत.