नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:01 PM2018-08-10T14:01:58+5:302018-08-10T14:03:42+5:30
यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात उशिराने मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे मे महिन्यापासून शेतीची मशागत करून ठेवलेल्या शेतक-यांचा पेरणीसाठी धीर सुटू लागला असताना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे पेरणीला वेग देण्यात आला.
नाशिक : हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजावर विसंबून राहून जुलैच्या पहिल्या आठवड्यात पीकपेरणी करून पावसाकडे आशा लावून बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील आठ तालुक्यातील लाखो शेतकऱ्यांची दुबार पेरणीची संधीही संपुष्टात येण्याचे संकट घोंघावू लागले असून, आॅगस्टच्या दुसरा आठवड्यातही वार्षिक सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सन २०१२ मध्ये अशाच प्रकारे जुलै अखेर ९७ टक्के पेरण्या झाल्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यावर कोसळलेल्या संकटाची पुनरावृत्ती होते की काय अशी भीतीही यानिमित्ताने व्यक्त होवू लागली आहे.
यंदा जूनच्या शेवटच्या आठवड्यात उशिराने मान्सूनचे जिल्ह्यात आगमन झाल्यामुळे मे महिन्यापासून शेतीची मशागत करून ठेवलेल्या शेतक-यांचा पेरणीसाठी धीर सुटू लागला असताना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे पेरणीला वेग देण्यात आला. जून महिन्यातील पर्जन्यमानाचा विचार करता, फारसा समाधानकारक पाऊस झाला नसला तरी, जमिनीची धूप कमी होण्यास त्यामुळे मदत झाल्याने जुलै महिन्यात दमदार पावसाच्या भरवश्यावर जवळपास ८२ टक्के पेरणी पूर्ण करण्यात आली. उर्वरित पेरणी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली. परंतु जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे महिनाभरापूर्वी पेरणी केलेल्या पिकाला आता ख-या अर्थाने पावसाची गरज आहे. साधारणत: जिल्ह्याच्या पूर्व भागातील मालेगाव, देवळा, नांदगाव, येवला, बागलाण, चांदवड या तालुक्यांतील मका, बाजरी पिकाचे दाणे भरण्याची अवस्था आणखी दहा ते बारा दिवसांत सुरू होणार असून, याच काळात कपाशींचे बोंड फुटणार आहे. पिकाचे उत्पन्न वाढीसाठी या काळात पिकांना पाणी हवे आहे, त्याचबरोबर पश्चिम पट्ट्यातील पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यात भाताची आवणी पूर्ण होवून त्यांनाही आता फुटवे फुटू लागले आहेत. सध्या तरी या भागात अधून-मधून पावसाची हजेरी कायम असल्याने त्यांना फारशी चिंता नसली तरी, एकदमच पावसाने दडी मारल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यात पावसाअभावी उशिराने पेरणी करण्यात आल्याने या ठिकाणी पाऊस पडूनही उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.