धरणे तुडुंब : गोदावरीही वाहिली दुथडी भरून यंदा नाशकात १७० टक्के विक्रमी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 01:16 AM2017-10-27T01:16:01+5:302017-10-27T01:16:16+5:30
‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा घालू’ असे आर्जव करण्याची वेळ येईपर्यंत यंदाच्या मोसमात पाऊस नाशिक शहरात भरभरून कोसळला. यंदा पावसाळ्यात शहरात ११८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती वार्षिक सरासरीच्या तुलनेत १७० टक्के इतकी विक्रमी नोंदविली गेली आहे.
नाशिक : ‘नको नको रे पावसा, असा धिंगाणा घालू’ असे आर्जव करण्याची वेळ येईपर्यंत यंदाच्या मोसमात पाऊस नाशिक शहरात भरभरून कोसळला. यंदा पावसाळ्यात शहरात ११८५ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, ती वार्षिक सरासरीच्या तुलनेत १७० टक्के इतकी विक्रमी नोंदविली गेली आहे. सुमारे ९० हून अधिक दिवस कोसळणाºया पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहातील पाणीसाठा ९९ टक्के झाला आहे, तर गोदावरी नदीही यंदा ८ ते १० वेळा दुथडी भरून वाहताना पाहण्याचे भाग्य नाशिककरांच्या वाट्याला आले आहे.
नाशिक शहरात वार्षिक सरासरी ६५० ते ७०० मि.मी. पावसाची नोंद होते. यंदा, जून महिन्यापासूनच वरुणराजाने दाखविलेली कृपादृष्टी परतीच्या पावसापर्यंत कायम राहिली. यंदाच्या मोसमात नाशिक शहरात १ जूनपासून ते आतापर्यंत ११८५ मि.मी. पावसाची नोंद हवामान खात्याने नोंदवलेली आहे. त्यामुळे यंदा तब्बल १७० टक्के विक्रमी पाऊस झाला असून, पावसाचे दिवसही सर्वाधिक म्हणजे शंभरहून अधिक राहिले आहेत. सन २००५ मध्ये ११४८ मि.मी., २००६ मध्ये ११७५ मि.मी., २००७ मध्ये १०४५ मि.मी., २००८ मध्ये १०९७ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर, पावसाने हजारापर्यंत सरासरी गाठली नव्हती. यंदा मात्र, पाऊस भरभरून मनसोक्त कोसळला. गणेशोत्सवासह नवरात्रोत्सवातही वरुणराजाने हजेरी लावली. दिवाळीच्या अगोदरपर्यंत पाऊस कोसळतच होता. तीन वर्षांपूर्वी गोदावरीला एकही पूर आलेला नव्हता. सर्वसाधारणपणे दर पावसाळ्यात सुमारे ३ ते ४ पूर गोदावरीला येतात. यंदा मात्र ८ ते १० वेळा गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरण समूहातील पाणीसाठाही ९९ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दारणा धरणही शंभर टक्के भरले आहे. यंदा प्रथमच गंगापूर धरण समूहातून तब्बल ७० टीएमसी पाणी हे मराठवाड्यातील जायकवाडी धरणात जाऊन पोहोचले आहे. त्यामुळे, दरवर्षी होणारा नाशिक-नगर-मराठवाड्याचा पाणीतंटा यंदा होण्याची सुतराम शक्यता नाही. यंदा भरघोस पर्जन्यमान झाल्याने नाशिक महापालिका सुखावली असून, यंदा जलसंपदा विभागाकडे ४६०० द.ल.घ.फू. पाणी आरक्षणाची मागणी नोंदविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत जिल्हा प्रशासनाकडे होणाºया बैठकीत पाणी आरक्षणावर शिक्कामोर्तब होईल.