दुष्काळी गावे जलपरिपूर्णतेकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 01:04 AM2019-07-29T01:04:35+5:302019-07-29T01:05:16+5:30
जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत.
नाशिक : जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात ८५ टक्क्यांपेक्षा अधिक कामे झाली असली तरी दुष्काळी परिस्थितीमुळे त्याचा परिणाम दृश्य स्वरूपात दिसला नाही. मात्र मागील तीन वर्षांच्या कामाचा लेखाजोखा पाहिल्यास अनेक दुष्काळी गावेही जलपरिपूर्ण झाली आहेत. यंदा १३७ गावांमध्ये १०० टक्के, तर १४६ गावांमध्ये ४६ टक्के गावे परिपूर्ण झाली आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सर्व कामे ३० टक्क्यांच्या पुढे झाली आहेत.
गोहरण, डुबेरवाडी आदर्श
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील डुबेरवाडी या गावाला उत्कृष्ट काम झाले आणि दुष्काळी तालुक्यातील या गावातील जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. चांदवडमधील गोहरण, आडगाव आणि वडगाव पंगू या गावांमध्येदेखील पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे पिकाखालील तसेच सिंचनाचे क्षेत्र वाढले आहे. गावातील के.टी. वेअर आणि नालाबांध बंधाऱ्यामुळे पाणी जमिनीत मुरले आहे.
जलयुक्त शिवार कामे
जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ के.टी. वेअर दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्रोतातील गाळ काढणे, जलस्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.