ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा मातोश्रीवरच प्रवेश आणि बांधले शिवबंधन; दादा भुसे यांचे प्रत्युत्तर
By संजय पाठक | Published: October 12, 2023 10:19 AM2023-10-12T10:19:35+5:302023-10-12T10:19:50+5:30
माजी महापौरांनी आणले पक्षात
संजय पाठक
नाशिक- ड्रग्ज माफिया ललित पाटील हा मूळचा नाशिकचा असून त्याच्याशी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांचे संबंध असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. मात्र, ललित पाटील याचा मातोश्रीवर प्रवेश सोहळा झाला होता आणि शिवबंधन बांधण्यात आले होते, शिवसेनेचा त्या वेळी प्रतिनिधी म्हणून उपस्थित होतो असे प्रत्युत्तर राज्याचे बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहे.
नाशिक मध्ये पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी हे उत्तर देताना नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांच्या माध्यमातून ललित पाटीलचा प्रवेश झाला असेही ते म्हणाले. पाटील हा कोणत्या नेत्याच्या प्रचार आणि मिरवणुकीत उपस्थित होता आणि कोणाची 'तुला' करताना तो हजर होता हे सर्वांना माहिती आहे.
ड्रग्ज प्रकरणातील आरोपी देश विघातक काम करत होता त्याला कोणीही पाठीशी घालणार नाही, असे भुसे म्हणाले. तो आधी पकडणे महत्वाचे असून मग बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील असेही भुसे म्हणाले. या प्रकरणाची राज्य नव्हे तर देश आणि विदेश पातळीवर चौकशी झाली पाहिजे असेही भुसे यांनी सांगितले.