नाशकात औषधविक्रीचा घोटाळा
By admin | Published: January 26, 2017 12:37 AM2017-01-26T00:37:24+5:302017-01-26T00:37:40+5:30
अन्न-औषध प्रशासन : घाऊक विक्रेत्यांवर परवाने रद्दची कारवाई; पोलिसांत गुन्हा
नाशिक : औषधनिर्मात्या कंपनीकडून हॉस्पिटलसाठी घाऊक विक्रेत्यांमार्फत पाठविण्यात येणारी सवलतीच्या दरातील औषधे बनावट मागणीद्वारे मागवून घेत त्यांची परस्पर रिटेलर्सला विक्री करून औषध घोटाळा व गैरव्यवहार तसेच कंपनीची फसवणूक केल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाने नाशिकमध्ये उघडकीस आणला आहे़ या प्रकरणी गोळे कॉलनीतील दोन घाऊक
औषध विक्रेत्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून त्यांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत़ दरम्यान, एफडीएकडून मनमानी पद्धतीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत त्याविरोधात घाऊक विक्रेत्यांनी दुकान बंद आंदोलन सुरू केले आहे़
औषध निर्मिती करणारी सिप्ला ही कंपनी हॉस्पिटलसाठी सवलतीच्या दरात घाऊक विक्रेत्यांमार्फत औषधे पाठविते़ यासाठी हॉस्पिटल्सना औषधांच्या करात सूट मिळून रुग्णाचाही फायदा होतो़ नाशिकमधील काही घाऊक विक्रेत्यांनी हॉस्पिटलच्या नावाने बनावट मागणीअर्जाद्वारे कंपनीकडून औषधे मागवून आर्थिक गैरव्यवहार तसेच कंपनीची व सरकारची फसवणूक केल्याची लेखी तक्रार अन्न व औषध प्रशासन विभागाकडे करण्यात आली होती़ त्यानुसार गत महिनाभरापासून घाऊक औषध विक्रेत्यांची चौकशी सुरू होती़ एफडीएच्या चौकशीत घाऊक विक्रेत्यांनी सिप्ला कंपनीकडे हॉस्पिटलच्या नावाने केलेल्या औषधांच्या आॅर्डरची कागदपत्रे बनावट असल्याचे तसेच औषधांच्या विक्रीच्या नोंदीमध्येही अनियमितता आढळून आली़ घाऊक औषध विक्रेत्यांनी सवलतीच्या दरातील ही औषधे कमिशन घेऊन रिटेलर्सला तर रिटेलर्सने नफा बाजूला काढून घेत रुग्णांना विक्री केली़ संबंधितांनी सिप्ला कंपनीकडे बनावट कागदपत्रांद्वारे आॅर्डर करून कंपनीची व सरकारी कर बूडवून सरकारचीही फसवणूक केली़ तसेच ही औषधे हॉस्पिटलला पुरविण्यातच आली नसल्याचेही चौकशीत समोर आले आहे.
सिप्ला कंपनीच्या या औषधांसाठी घाऊक औषध विक्रेत्यांनी हॉस्पिटलच्या नावाने बनावट आॅर्डर व बनावट बिलांची कागदपत्रे कंपनीला पाठविल्याचे चौकशीत निष्पन्न झाले़
त्यानुसार गोळे कॉलनीतील दोघा घाऊक औषध विक्रेत्यांविरोधात शनिवारी (दि़ २१) फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांचे
परवानेही एफडीएने निलंबित केले आहेत़ (प्रतिनिधी)