अमली पदार्थाची तस्करी : दोघा तिबेटीयनांवर कारवाईपंधरा वर्षे कारावास
By admin | Published: September 12, 2014 12:51 AM2014-09-12T00:51:23+5:302014-09-13T01:05:30+5:30
अमली पदार्थाची तस्करी : दोघा तिबेटीयनांवर कारवाईपंधरा वर्षे कारावास
नाशिक : अमली पदार्थाची वाहतूक व तस्करी करण्याच्या आरोपावरून न्यायालयाने दोघा तिबेटीयांना प्रत्येकी पंधरा वर्षे कारावास व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. नाशिक न्यायालयात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये शिक्षा होण्याची ही अलीकडची पहिलीच वेळ आहे.
त्सेसिंग टॉबजेस ऊर्फ जिलेबीभाई व टॅमडिन सिचोई ऊर्फ छोटूभाई अशी या दोघा आरोपींची नावे आहेत. शहरातील तिबेटीयन मार्केट येथे स्वेटर विकण्याच्या बहाण्याने ते अमली पदार्थाची तस्करी करीत असल्याची माहिती मुंबईच्या इंटेलिजन्स विभागाला लागली होती. त्यांनी १३ फेब्रुवारी २०११ रोजी दुपारी अचानक तिबेटीयन मार्केटमध्ये छापा मारून गाळा नंबर ९२ मध्ये झडती घेतली असता ६६ किलो हशीश जप्त करण्यात आले होते.
नाशिक पोलीस आयुक्तालयापासून अगदीच हाकेच्या अंतरावर इतक्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थाचा साठा करण्यात आल्याची भनक नाशिक पोलिसांना नव्हती. मुंबईच्या पथकाने संपूर्ण साठा ताब्यात घेतल्यानंतर दोघा आरोपींना अटकही करण्यात आली. तेव्हापासून ते मध्यवर्ती कारागृहात आहेत.
या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ऊर्मिला जोशी-फलके यांच्यासमोर होऊन सरकारतर्फे विशेष सरकारी वकील सुधीर कोतवाल यांनी सात साक्षीदार तपासले. त्यात दोन्ही आरोपींविरुद्ध सबळ पुरावा सिद्ध झाल्याने न्यायालयाने अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा कलम २० (२) (क) अन्वये प्रत्येकी पंधरा वर्षे सक्तमजुरी व कलम २९ अन्वये पुन्हा पंधरा वर्षे सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. आरोपींनी दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. (प्रतिनिधी)