अंबड, सिडकोत ढोल-ताशांचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 01:30 AM2019-09-03T01:30:10+5:302019-09-03T01:30:31+5:30
‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली.
सिडको : ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली.
सिडको, अंबडसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाची तयारी केली जात होती. सोमवारी सकाळपासून गल्ली, चौकांमध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’चा आवाज घुमला. ढोल, ताशांच्या गजरात, गुलाल उधळीत गणेशभक्तांनी ठिकठिकाणी मिरवणुका काढून ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना केली. सिडकोत मौल्यवान गणपती मंडळांमध्ये एकता विविध विकास सेवा संस्था, पेलिकन बहुद्देशीय संस्था मंडळाचा समावेश आहे.
मोठ्या गणपती मंडळांमध्ये सिडकोचा महाराजा मित्रमंडळ, शुभम पार्क मित्रमंडळ, राजे सांस्कृतिक कला क्रीडा मंडळांचा समावेश आहे. या मंडळांनी ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुका काढून श्रींची प्रतिष्ठापना केली. मोठ्या मंडळांच्या ठिकाणी विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सिडकोतील पवननगर, त्रिमूर्ती चौक, स्टेट बँक चौक, जुने सिडकोतील शॉपिंग सेंटर, भाजी मार्केट, दत्त चौक या भागातील बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात पूजेचे साहित्य, पुष्पहार, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गणेशभक्तांनी गर्दी केली होती.
देखाव्यांचे काम
अंतिम टप्प्यात
सिडको, अंबड परिसरात सार्वजनिक मित्रमंडळांकडून सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक देखावे तयार करण्याचे काम सुरू आहे. बहुतांश मंडळांचे देखावे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. देखावे पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते युद्धपातळीवर काम करीत आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत देखाव्यांचे काम पूर्ण होईल, असे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
इंदिरानगर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’चा जयघोष व ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत इंदिरानगर व परिसरात श्री गणरायाचे सोमवारी उत्साहात आगमन झाले. सकाळपासूनच घराघरात आणि मंडळांमध्ये ‘श्रीं’च्या आगमनाची लगबग सुरू होती. पूजेचे साहित्य आणि श्रींची मूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
राणेनगर चौफुली येथील श्री गणरायाची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येऊन युनिक ग्रुपच्या मैदानावर समारोप करण्यात आला. यावेळी श्री गणरायाची प्रतिष्ठापना सभागृहनेता सतीश सोनवणे व अनिता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आली. अजय मित्रमंडळाची श्रींची मिरवणूक जॉगिंग ट्रॅक येथून आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सुरू करण्यात आली.
शास्त्रीनगर, गजानन महाराज मंदिर, मोदकेश्वर चौक, बापू बंगला, सावरकर चौक मार्गे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रस्थानी तीन गणेशमूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. तसेच महिलांच्या ढोल पथकाने व श्रींच्या पालखीने सर्वांचे लक्ष वेधले होते. यावेळी आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी यांसह नागरिक उपस्थित होते. श्री प्रतिष्ठान, इंदिरानगर उत्सव समिती, ज्ञानेश्वरनगर येथील छावा क्रांतिवीर सेना प्रणित शंभू नारायण ग्रुप, स्वा. वि. दा. सावरकर मित्रमंडळ या मंडळांनीही गणरायांची मिरवणूक ढोल-ताशाच्या गजरात काढली.