त्र्यंबकेश्वरमध्ये तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींची ‘झिंग’ उतरविली; नेकलेस धबधब्याजवळ धो-धो धुतले
By अझहर शेख | Published: July 31, 2023 04:30 PM2023-07-31T16:30:10+5:302023-07-31T16:30:30+5:30
शहरातून वीकेण्डला त्र्यंबकेश्वरच्या पहिनेबारी पर्यटनस्थळावरील नेकलेस धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात.
नाशिक : त्र्यंबकेश्वरजवळील पहिनेबारी येथील पर्यटनस्थळावर तरुणींना छेडणाऱ्या मद्यपींच्या टोळक्याला स्थानिक गावकरी युवकांनी ‘गावाचे नाव बदनाम करू नका...’ असे म्हणत हटकले असता मद्यपींनी त्या दोघा युवकांना मारहाण केली. यावेळी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत मद्यपींना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही मारहाण करण्यासाठी हातात दगड उचलून मद्यपींनी शिवीागाळ सुरू केली. यामुळे कमर्चाऱ्यांनी या आठ मद्यपींच्या टोळीला पाण्यातच काठ्यांचा ‘प्रसाद’ देत ‘नशा’ उतरविली.
शहरातून वीकेण्डला त्र्यंबकेश्वरच्या पहिनेबारी पर्यटनस्थळावरील नेकलेस धबधबा बघण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक दाखल होतात. त्र्यंबकेश्वर भागात पावसाची दमदार हजेरी असल्याने याठिकाणी निसर्ग बहरला आहे. हिरव्यागार निसर्गरम्य वातावरणाची मोहिनी पर्यटकांना पडू लागली आहे. याठिकाणी नाशिककर आपल्या सहकुटुंबासह पर्यटनाला जातात. तसेच त्र्यंबकेश्वरला विविध राज्यांतून येणारे भाविक पर्यटकही याठिकाणी पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटताना दिसतात. याचवेळी नाशिक शहरामधील दहा तरुणांच्या ग्रूपपैकी आठ मद्यपींनी याठिकाणी धुडगूस घालत येथील गावकऱ्यांच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या तपासणीनाक्यावर हुल्लडबाजी केली.
प्रवेश शुल्क भरून पावती घेण्यास नकार दिला. यावेळी मद्यपींना चालणेदेखील अवघड होत असल्याचे लक्षात येताच समितीच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना धबधब्याजवळ जाण्यापासून नाक्यावरच रोखले. यावेळी त्यांनी चोरवाटेने जंगलात प्रवेश केला व धबधब्याजवळ दोन तरुणींना छेडले. हा प्रकार येथे असलेल्या दोन स्थानिक युवकांनी बघितला असता त्यांना हटकले. त्याचा राग मनात धरून संशयित आठ मद्यपींच्या टोळीने दोघांना जबर मारहाण केली, अशी माहिती त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
प्रवेश शुल्क गावाच्या विकासासाठी
नाशिक पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्रातील पहिने गावाच्या विकासासाठी शासनआदेशानुसार वनपरिक्षेत्र कार्यालयाने ‘पहिने संयुक्त वन व्यवस्थापन समिती’ गठीत केली आहे. या समितीकडून पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून नाममात्र प्रवेश शुल्क आकारणी केली जाते. जमा होणारा महसूल गावाच्या विकासासाठी वापरला जातो, असा दावा वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश पवार यांनी केला आहे. या महसूलामधून पर्यटकांसाठी याठिकाणी सोयीसुविधाही पुरविण्याचा प्रयत्न वनविभागाकडून केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पहिने बारी हे पर्यटनस्थळ राखीव वन आहे. या भागात पर्यटनाचा आनंद नागरिकांनी अवश्य घ्यावा; मात्र संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांना, वनरक्षकांना सहकार्य करावे. त्यांच्या सुचनांचे पालन करत सुज्ञ, सुजाण नागरिकाची भूमिका बजवावी. आपल्यामुळे कोणाच्या आनंदाचा भंग होणार नाही, याची काळजी घ्यावी. गैरवर्तन, अश्लील चाळे, मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाऱ्यांवर वन गस्तीपथकाद्वारे वन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहे.
- राजेश पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, त्र्यंबकेश्वर